हिंजवडीत खाजगी कारने प्रवास करणे पडले महागात; चाकूचा धाक दाखवून चालत्या कारमध्ये दोघांनी एकाला लुटले

0
1010

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – एका खाजगी कारने मुंबईला निघालेल्या एका प्रवाशाला दोन अज्ञात तरुणांनी चाकून धाक दाखवून त्याच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल आणि लॅपटॉप असा एकूण १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्ती चोरुन नेला. त्यानंतर प्रवाशाला निर्जनस्थळी सोडून चोरटे पळून गेले. ही घटना रविवारी (दि.१०) रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाकड ब्रीज ते भुमकर चौक दरम्यान घडली.

मुकेश मोहिंदर कपुर (वय ४६, रा. बिल्डींग क्र. १०, एफएल नं. १३०२, सनवे मेगापोलीस फेज ३, हिंजवडी) असे लुटमार झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकेश यांना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबईला जायचे होते. यामुळे त्यांनी वाकड ब्रीज खालून मुंबईला निघालेली एक खाजगी स्वीफ्ट कार पकडली. कार भुमकर चौकात येताच कारमध्ये दोन अनोळखी इसम बसले त्यांनी कार काही अंतरावर जाताच चालत्या कारमध्येच मुकेश याला चाकूचा धाव दाखवला आणि त्यांच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल आणि लॅपटॉप असा एकूण १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्ती काढून घेतला. त्यानंतर मुकेश याला एका निर्जनस्थळी सोडून पळ काढला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस आरोपी चोरट्यांचा शोध घेत आहेत.