सोशल मीडिया अकाऊंट आधारशी लिंक करा – अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल

0
544

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – सोशल मीडिया अकाऊंट हे आधारशी लिंक करण्यात यावे, असे महत्त्वपूर्ण मत अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी  सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केले आहे. सोशल मीडिया अकाऊंट हे आधारशी लिंक करण्याच्या मागणीसाठी मद्रास, मुंबई आणि मध्य प्रदेशच्या  उच्च न्यायालयात याचिका दाखल  केल्या आहेत. या याचिकेवर आज (मंगळवार) सुनावणी झाली.

सोशल मीडियावरुन पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूज, देशविरोधी संदेश, बदनामीकारक आणि अश्लील मजकूर यावर अंकुश राखण्यासाठी सोशल मीडिया अकाऊंट्स हे आधारशी लिंक करणे गरजेचेच आहे, अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले.

या याचिका  सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात याव्यात,  यासाठी फेसबुकने   एक याचिका दाखल केली असून या याचिकेची  सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली.  तसेच यासंदर्भात केंद्र सरकार, गुगल, ट्विटर आणि युट्यूबला नोटीस पाठवली असून यावर १३ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, सोशल मीडिया आधारशी जोडण्यास फेसबुकने विरोध दर्शविला आहे. फेसबुकने म्हटले आहे की, १२ अंकी आधार क्रमांक वापरकर्त्याकडे मागणे हे गोपनीयतेच्या धोरणाचे उल्लंघन ठरेल. तिसऱ्या पक्षासोबत आम्ही युजर्सचा आधार क्रमांक शेअर करु शकत नाही. तसेच व्हॉट्स अॅपचे संदेश दुसरा कोणीही पाहू शकत नाही, आम्हाला देखील तो पाहता येत नाही, असेही फेसबुकने स्पष्ट केले आहे. आम्ही युजर्सना त्यांचा आधार क्रमांक कसा काय विचारु शकतो. आम्हाला देखील वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी लागते, असे  फेसबुकने म्हटले आहे.