सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून जीवे मारण्याची धमकी.

0
278

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – तळेगाव शहरात सोशल मीडियावरील स्टेट्स वॉर अजूनही सुरूच आहे. या स्टेटस वॉर मधून मागील काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा खून झाला. त्यानंतरही स्टेटस वरून वाद होण्याच्या घटना थांबत नाहीत. इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवण्यावरून तरुणाच्या घरात घुसून त्याला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. ३) सायंकाळी टेल्को कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

विकास कनकुटे (वय २५, रा. कातवी, ता. मावळ), साहिल सोनवणे (वय २२, रा. वडगाव, ता. मावळ), निलेश सोपान कनकुटे (वय २४, रा. कातवी, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीच्या भावाने इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवले या कारणावरून आरोपी शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या घरात आले. त्यांनी फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ करून हाताने व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांनतर जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. पोलिसांनी विकास आणि निलेश या दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत