सुप्रिया सुळे होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री ?

279

मुंबई, दि. १ (पीसीबी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. ३० नोव्हेंबर) एका कार्यक्रमात बोलताना ‘एक कर्तबगार माणूस आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसावयाचा आहे, मग ती महिला असू की पुरुष’ असे विधान केले आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या मनात नेमकं कुणाचं नाव आहे, अशी चर्चा राज्यात सुरू झाली आहे. महिला मुख्यमंत्रीपदासाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे यांचेच नाव सर्वाधिक चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यासाठी पध्दतशीर मोर्चेबांधनी केली असून भाजपला धोबीपछाड करण्याची ही खेळी असल्याचे बोलले जाते. दरम्यान, चारवेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादा पवार हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असताना अचानक सुळे यांचे नाव ठाकरे यांच्या माध्यमातून पुढे आल्याने राष्ट्रवादीत प्रचंड असंतोष खदखदतो आहे.

पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुळे यांच्या खालोखाल भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावरही चर्चा आहे.
महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री अशी चर्चा जेव्हा सुरू होते. तेव्हा पहिले नाव अर्थातच बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे येते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातसुद्धा त्यांच्या नावाची चर्चा होती. पण, खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र आपण राज्यात इच्छूक नसून मला देशाच्या राजकारणात रस आहे, असे सांगून त्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण, महिला मुख्यमंत्र्यांचा विषय निघतो, तेव्हा सुळे यांचे नाव आघाडीवर असते.

पंकजा मुंडे यांनी तर स्वतःच आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. त्या विधानावरूनच पंकजा मुंडे यांना राज्यात राजकारणात बॅकफूटवर यावे लागले, हेही तितकेच सत्य आहे. पण महिला मुख्यमंत्रीपदासाठी पंकजा मुंडे यांचेही नाव चर्चेत येत असते. मध्यंतरीच्या काळात भाजपकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी आणि त्यानंतर मंत्रिपदाने हुलकावणी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाराज पंकजा मुंडे या शिवसेनेत जाणार अशीही चर्चा रंगली होती. मात्र, त्यावर पंकजांनी अद्याप मौन बाळगले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा शिवसेनेत प्रवेश आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ पंकजा यांच्या गळ्यात पडणार, अशी चर्चा समर्थकांकडून होत असते.

मध्यंतरी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करा, असे विधान केले होते, त्यामुळे रश्मी ठाकरे यांचेही नाव महिला मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आले होते. अर्थातच त्याचा सर्वस्वी निर्णय हा उद्धव ठाकरे यांचा असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर रश्मी यांनी ठाण्याचा दौरा केला होता. त्यामुळे रश्मी ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश होणार अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती.