सीएनजी दरवाढीचा रिक्षा चालकांकडून तीव्र निषेध

0
228

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – आधी डिझेल, पेट्रोल व आता सीएनजी सहा रुपयांनी वाढला. त्याच्या निषेधार्थ रिक्षा चालकांसह कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आंदोलन करण्यात आले.

कामगार नेते काशिनाथ नखाते, दिनेश गोटणकर, दिनकर खांडेकर, राजू बोराडे, रामा मोरे, गुरू बडदाळे, हनुमंत शेलार , पप्पू तेली, मनोज यादव, फरीद शेख, कासिम तांबोळी, राजू हांडे, सुखदेव कांबळे आदी उपस्थित होते.

रिक्षा चालक व सर्वसामान्य नागरिकांची अनेक वाहने सीएनजी गॅसवर धावतात. पिंपरी-चिंचवड, पुणे, चाकण, तळेगाव, हिंजवडी या परिसरातील सीएनजी गॅसचा भाव काल सहा रुपयांनी वाढवत 91 रुपयांवर गेला. गेल्या पाच महिन्यात तब्बल 29 रूपयांची वाढ झाली. लवकरच हा आकडा शतक पार करेल? याची भितीही सामान्य नागरिकांमध्ये आहे. ही दरवाढ, प्रचंड महागाई व बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिक व रिक्षा चालकांत तीव्र नाराजी असून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. एकीकडे गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहेत मात्र जिल्हा प्रशासनाकडून रिक्षाच्या भाडे दरवाढीस शासन चालढकल करत आहे यासाठी तीव्र लढाई करू असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

एकीकडे पेट्रोल ,डिझेल व गॅसचे दर वाढत आहेत. मात्र प्रवासी भाडे वाढवण्याबाबत प्रशासन कुठलाही निर्णय घेत नाही. वाढवण्यात आलेली तुटपुंजी दरवाढ तीही तेही सध्या सर्वांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना भाडेवाढ समाधानकारक देण्यात यावी, अशी मागणी रिक्षाचालकाकडून करण्यात आली आहे.