सावधान…लग्नाला जादा वऱ्हाडींची उपस्थिती अशी महागात पडू शकते

0
399

आळंदी, दि.४ (पीसीबी) – लग्न समारंभासाठी ५० जणांना प्रशासनाने परवानगी दिली असताना ८० वऱ्हाडी मंडळी आल्याने थेट मंगल कार्यालयाच्या मालकावर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आळंदीमध्ये महिन्याकाठी शेकडो विवाह समारंभ पार पडतात. पण अश्या प्रकारचा गुन्हा पहिल्यांदाच नोंदविण्यात आला. या प्रकरणी नक्षत्र मंगल कार्यालयाचे मालक संदीप तानाजी जगताप (३२) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचारी बाजीराव भगवान सानप यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाने करोना महामारीचा संसर्ग होऊ नये यासाठी काही नियम लागू केले आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी न होता सर्रास नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. प्रशासनाने लग्न समारंभात ५० नागरिकांना परवानगी दिलेली आहे. असे असतानाही आळंदीमध्ये झालेल्या एका लग्न समारंभात ८० जण आले असल्याचे समोर आले. वऱ्हाडी मंडळींनी सोशल डिस्टसिंगचा नियम पाळला नाही. याशिवाय अनेकांच्या तोंडाना मास्कदेखील नव्हते, असे पोलीस फिर्यादीमध्ये म्हटले.

आळंदी वडगाव रोडवरील नक्षत्र मंगल कार्यलायात हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी मंगल कार्यालयाचे मालक संदीप तानाजी जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.