घरफोड्या करणाऱ्या कुख्यात ‘सीएम’ टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक

0
221

पिंपरी, दि.४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या सीएम टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चार जणांच्या या टोळीकडून तब्बल 381 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे दागिने आणि अन्य साहित्याचे असा एकूण 19 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चंद्रकांत ऊर्फ सीएम अनंत माने (वय 20, रा.मोरया हाऊसिंग सोसायटी, वेताळ नगर, चिंचवड), राजु शंभु देवनाथ ऊर्फ राजू बंगाली (वय 20, रा. वेताळ नगर, चिंचवड), राम ऊर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर (वय 26, रा मू.पो. वाधोली गौर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), अमोल ऊर्फ भेळया अरुण माळी ऊर्फ घुगे (वय 27, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पोलीस हवालदार नारायण जाधव आणि व पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांना माहिती मिळाली की, पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार असलेला सराईत घरफोड्या करणारा आरोपी चंद्रकांत ऊर्फ सीएम हा त्याच्या साथीदारांसोबत उस्मानाबाद मधील कळंब तालुक्यातील वाघोली गौर येथे लपून बसला आहे. पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून चार जणांना ताब्यात घेतले.

टोळीकडे चौकशी केली असता टोळीने मागील तीन महिन्यांच्या कालावधीत नऊ ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यामध्ये चोरीला गेलेले 381 ग्रॅम सोन्याचे, 1 किलो चांदीचे आणि घरफोडीतील अन्य साहित्य असा एकूण 19 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींनी पुणे परिसरातील एका सराफाला साडेपाच लाखांचे 109 ग्रॅम सोन्याचे दागिने विकले होते. त्या सराफाचा पोलीस शोध घेत आहेत. या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन, निगडी चार, देहूरोड दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक असे एकूण नऊ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत एकूण 76 गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या चंद्रकांत ऊर्फ सीएम याला जानेवारी 2019 मध्ये दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

आरोपी दुपारच्या वेळी रिक्षाने फिरून सीसीटीव्ही आणि वॉचमन नाही अशा सोसायट्यांचा शोध घेत. त्यानंतर रात्रीच्या वेळी आरोपी चंद्रकांत आणि राजू घरफोडी करत. त्यावेळी आरोपी राम आणि अमोल रस्त्यावर पहारा देत असत.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकूळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, पोलीस कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैव, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे, आजिनाथ औबासे, सुखदेव गावंडे, गोंविद चव्हाण, तांत्रिक विश्लेषन विभाग गुन्हे शाखेचे नागेश माळी, राजेंद्र शेटे यांनी केली आहे.