सावधान – दक्षिण आफ्रिकेतून ‘या’ शहरात आलेल्या एका व्यक्तीमध्ये लक्षणे

0
352

पुणे, दि. ३० (पीसीबी) – दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन व्हेरीएंटचा धोका लक्षात घेऊन आता संपूर्ण आरोग्य व्यवस्था परदेशातून येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे सुद्धा धोकादायक देशांमधून येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवले जात आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीमध्ये लक्षणे आढळली असून त्याची चाचणी करण्यात आली आहे.

पुण्यातील करोनाची परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे सर्व आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला असताना आता करोनाचे नवीन व्हेरींएट समोर आल्यामुळे चिंता वाढली आहे. महापालिका प्रशासनानेही तयारी सुरू केली असून राज्य शासनाकडून यासंदर्भात मार्गदर्शक सूचना महापालिका प्रशासनाला मिळालेल्या आहेत.

जगभरात सध्या कारोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला योग्य ती सावधगिरी बाळगण्याच्या सुचना केल्या आहेत. महापालिकेचा आरोग्य विभागही आता कामाला लागला आहे. शहरात गेल्या काही दिवसांत परदेशातून आलेल्या विशेषत: दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, ऑस्ट्रिया, झिम्बाब्वे, जर्मनी, इस्रायल या देशातून कोणी नागरीक आले आहेत का? त्याची माहिती गोळा केली जात आहे. एक नागरिक पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आला आहे. त्याचा शोध लागला असून, त्या व्यक्तीला करोनाची लक्षणे असल्यामुळे त्याची चाचणी केली गेली आहे. ती व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्यास त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की कसे याची चाचणी केली जाणार आहे. त्या व्यक्तीला सध्या होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

संबंधित देशातून पुण्यात येण्यासाठी थेट विमान सेवा नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या भारतातील शहरातून पुण्यात आलेल्यांची माहिती गोळा केली जाणार आहे. सध्या करोना बाधितांची संख्या वाढत असली तरी हा संसर्गातील चढ उतार असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, असंही वावरे यांनी सांगितलं.