आता पुणे महापालिकेच्या शाळा डिसेंबरच्या ‘या’ तारखेपासून होणार सुरु

0
230

पुणे, दि. ३० (पीसीबी) : मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलधीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळं पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचं चित्र दिसून आलं होतं. अखेर पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळांची तयारी पूर्ण मात्र पालिकेचा सावध पवित्रा
पुण्यातील शाळांनी पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण केलीय. तर, दुसरीकडे शाळा सुरु करावी अशी पालकांची भूमिका आहे. मात्र, पुणे महापालिकेनं ओमिक्रॉन वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा घेत शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूरमध्येही आज निर्णय होणार
सोलापूर महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासंबंधीचा निर्णय आज घेण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर हे यासंबंधी निर्णय घेणार आहेत. तर, नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय देखील लांबणीवर टाकण्यात आला आहे. तर, मुंबई महापालिकेनं देखील पहिली ते चौथीचे वर्ग उद्यापासून सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुणे महापालिका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईतही 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार
पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार नाहीत. मुंबई महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळं मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे.