सारंग पाटील पदवीधर मतदारसंघातून लढणार नाहीत

0
373

सातारा, दि. २८ (पीसीबी) – पुणे पदवीधर मतदारसंघाची येऊ घातलेली निवडणूक आपण लढवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रमुख आणि साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांनी स्पष्ट केले आहे. जोरदार तयारी करुनही नंतर आता माऱागीचा  निर्णय पाटील यांनी जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, असे दिसले. राष्ट्रवादीक़डे दुसरे नाव तयार असले तरी पाटील यांच्याबाबत लोकमत तयार होते, आता भाजपसाठी मैदान मोकळे झाले अशीही चर्चा आहे.

पाटील म्हणाले, “मागील निवडणुकीत पराभूत झाल्यापासून या निवडणुकीत उमेदवारी करायची या जिद्दीने मी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. निवडणुकीची तयारी म्हणून मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीही मी केली. यावेळी थेट आणि ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत बूथ कमिटी स्तरापर्यंत माझा संपर्क आलेला आहे. कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीसाठी मोठी तयारी केली आहे. मात्र, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनवधानाने सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली. यात श्रीनिवास पाटील विजयी झाले, त्यानंतर मी हा निर्णय बदलला.”

पोटनिवडणुकीत पक्षाने श्रीनिवास पाटील यांना निवडणूक लढविण्याचा आदेश दिला. ही निवडणूक जिंकल्यानंतर मतदारसंघातील अनेक कामात माझा थेट संपर्क येऊ लागला आहे. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार पाटील यांचे काम पुढे घेऊन जाणे, मतदारसंघातील कामे होणे गरजेचे आहे. जर मी पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत लक्ष घातलं तर सातारा मतदारसंघातील कामे मागे पडतील. यासाठी मी पदवीधर मतदारसंघातील निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण सारंग पाटील यांनी दिले.

माझा निर्णय निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना मी कळवला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही माझा निर्णय कळविला आहे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी मी यासाठी जबाबदारीने काम करणार असल्याचे सारंग पाटील म्हणाले.