राज्यातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर जिंकू – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा विश्वास

0
314

 

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम राखण्याचे स्पष्ट संकेत भाजपने दिले आहेत. राज्यातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर जिंकू , असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी व्यक्त केला.

भाजपच्या नवनियुक्त राज्य पदाधिकाऱ्यांच्या पहिल्या बैठकीत नड्डा हे नवी दिल्लीहून दूरचित्रसंवादाच्या  माध्यमातून सहभागी झाले होते. भाजपची राज्यातील ताकद आणखी वाढविण्यासाठी अथक परिश्रम करण्याचे आवाहन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना करीत नड्डा यांनी पुढील प्रत्येक निवडणुकीत पक्ष स्वबळावर विजय संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला.

‘‘महाविकास आघाडी सरकार स्वार्थासाठी स्थापन झाले असून, आपली कमाई करणे एवढाच त्यामागे हेतू आहे. करोनासारख्या संकटकाळातही भ्रष्टाचार होत असल्याचे प्रकार राज्यातील पक्षाच्या नेत्यांकडून समजले आहेत. हा भ्रष्टाचार उघड करून सरकारविरोधातील लढा तीव्र करा’’, असे आवाहन नड्डा यांनी राज्यातील नेत्यांना केले. करोनाची परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही नड्डा यांनी केली.करोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचा फायदा राज्यातील उद्योजक, व्यावसायिक, बेरोजगार व सर्व स्तरातील जनतेला कसा होईल, यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची सूचना नड्डा यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत असल्याचेही नड्डा म्हणाले. भाजपचे सर्व पदाधिकारी, काही आमदार, खासदार व अन्य नेते या बैठकीत सहभागी झाले होते.

दरम्यान, सह्य़ाद्रीचा कडा, हिमालयाकडे कूच करा, अशा शब्दांत शिवसेनेच्या मुखपत्रात उद्धव ठाकरे यांनी आता राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने पाऊल टाकावे, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

नड्डा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर खरमरीत टीका केली असताना, पंतप्रधान मोदी यांनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गतस्मृतींना उजाळा दिला. ‘वाढदिवस हा गतकाळातील स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो आणि हा दिवस म्हणजे एक संधी असते’, असे मोदी यांनी उद्धव यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे पत्र प्रसिद्धीस देण्यात आले असून, या पत्रातून मोदी यांना कोणता संदेश द्यायचा आहे, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.