सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर ११ ते १३ जानेवारीदरम्यान मोफत अटल महाआरोग्य शिबीर; आमदार जगताप यांची माहिती

0
908

पिंपरी, दि. १० – राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १३ जानेवारी दरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर गरजू व गोरगरीब रुग्णांसाठी मोफत अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. या शिबीरात रुग्णांना झालेल्या गंभीर आजारावर लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे. ह्दयरोग, किडनी तसेच कॅन्सर आजारावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या महाआरोग्य शिबीराबाबत माहिती देताना आमदार जगताप म्हणाले, “सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सलग तीन दिवस हे महाआरोग्य शिबीर भरविण्यात येणार आहे. या शिबीरात ह्दयरोग व शस्त्रक्रिया, किडनी, हाडांचे व मणक्याचे आजार, कॅन्सर व शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग व शस्त्रक्रिया, मोफत श्रवणयंत्रे, मेंदूच्या आजारावरील शस्त्रक्रिया, गरोदर मातांना व्हॅक्सिन, आयुर्वेदिक उपचार, मूत्र मार्गाचे विकार, त्वचाविकार, फाटलेली टाळू व ओठावरील शस्त्रक्रिया, बॉडी चेकअप, एपिलिप्सी, कान-नाक-घसा तपासणी, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, गरोदर माता तपासणी, रक्तदाब, स्त्री-रोग, हिमोग्लोबिन तपासणी, राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत समाविष्ट होणारे सर्व आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, मोफत अॅन्जिओग्राफी, अपंगांना जयपूर फूट व कॅलीपर्सचे मोफत वाटप, मोफत चष्मे वाटप केले जाणार आहे.

विशेष म्हणजे या शिबीरात रुग्णांना झालेल्या गंभीर आजारावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. ह्दयरोग, किडनी विकार व प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, कॅन्सर रोगाशी निगडीत शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत

या शिबीरात जिल्हा रुग्णालय, रूबी हॉल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, स्टार हॉस्पिटल, इनलेक्स बुद्रानी (के. के. इन्स्टिट्यूट), एम्स हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड, केईएम हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, रूबी एलकेअर हॉस्पिटल, ओम हॉस्पिटल, इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल सिंहगड, देवयानी हॉस्पिटल, पायोनिअर हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड डॉक्टर असोसिएशन, आयएमए पीसीबी, पिंपरी-चिंचवड होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन, सरडीया फार्मा लिमिटेड, रेड स्वास्तिक, श्री नारायण धाम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वायसीएम हॉस्पिटल सहभागी होणार आहेत.

या महाआरोग्य शिबीरात आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी रेशनिंग कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना किंवा आधार कार्ड आणणे गरजेचे आहे. तसेच पूर्वी काही आजार असल्यास तसेच त्या आजारावर झालेल्या उपचाराचे रिपोर्ट आणणे आवश्यक आहे. डॉ. देविदास शेलार (८९९९२८४८९५), डॉ. ननावरे (९८२२१८६८०५), आदिती निकम (९७६२३५३६३७), सतीश कांबळे (८२०८४८७७२३), डॉ. दत्तात्रय देशमुख (८६५७१८८६५७) आणि मनीष कुलकर्णी (७०५७५५५५५५) यांच्याशी संपर्क साधून महाआरोग्य शिबीरासाठी नाव नोंदणी करता येईल, असे त्यांनी सांगितले.