सहा दुचाक्यांसह दोघे दुचाकी चोर जेरबंद, गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

0
869

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – वाहन चोरीचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस गस्तीवर असता पोलिसांनी पिंपरी नेहरुनगर येथील एक आणि चिंचवड येथील एका दुचाकी चोराला अटक करुन तब्बल २ लाख ८० हजार रुपयांच्या सहा दुचाक्या जप्त केल्या आहेत. या दोघांकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहे. ही कारवाई गुरुवार (दि. २५) करण्यात आली.

याप्रकरणी विकी दत्ता वाघमारे (वय २२, रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी) याला नेहरुनगर येथून तर सागर सचिन सातपुते (वय १९, रा. विठ्ठलवाडी, सिंहगड रोड, पुणे) याला चिंचवड स्टेशन परिसरातून अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी वाहन चोरी संदर्भातील गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखा युनिट एकचे पथक पिंपरीतील विठ्ठलनगर नेहरुगर येथील हनुमंतराव भोसले हॉस्पिटल समोर थांबले होते. यावेळी आरोपी विकी एक नंबर नसलेली दुचाकी घेऊन वेगाने पोलिसांच्या समोरुन निघून गेला. पोलिसांनी त्याला आडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पसार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेली मोटार सायकल ही चोरीचे असल्याचे त्याने सांगितले तसेच त्याने आणखी तीन मोटार सायकल चोरल्याचे पोलिसांनी सांगितले. यावर पोलिसांनी त्याच्याकडून एक बुलेट, एक होंडा युनिकॉर्न, एस स्प्लेंडर आणि एक सीडी डिलक्स या चार दुचाक्या जप्त केल्या. त्यांच्याकडून पिंपरी पोलीस ठाण्यातील दोन, दिघी पोलीस ठाण्यातील एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

तर चिंचवड स्टेशन येथून आरोपी सागर याला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याने दोन मोटार सायकल चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पॅशन प्लस आणि एक स्प्लेंडर प्लस अशा दोन दुचाक्या जप्त केल्या आहेत. यामुळे तळेगाव पोलीस ठाण्यातील दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, युनिट दोनचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार अजय भोसले, प्रमोद वेताळ, राजू केदारी, पोलीस नाईक अमित गायकवाड, सावन राठोड, निशांत काळे, शरीफ मुलाणी, सुनील चौधरी, स्वप्नील शिंदे, विशाल भोईर, सागर शेंडगे आणि गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.