सलाम तुझ्या कामगिरीला

0
326

नवी दिल्ली, दि.२० (पीसीबी) – ब्राझीलच्या फुटबॉलपटू पेले यांना महान का म्हणतात याची प्रचिती शनिवारी आली. एकाच क्लबकडून खेळताना सर्वाधिक ६४३ गोल करण्याच्या त्यांच्या विक्रमाशी अर्जेंटिनाच्या मेस्सीने बरोबरी केली. त्यानंतर पेले यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्याचे अभिनंदन केले. त्या वेळी त्यांनी ‘मेस्सी मी तुला मानतो, तुझ्या कामगिरीला माझा सलाम’ असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. स्पॅनिश लीगमध्ये बार्सिलोना संघीला व्हॅलेन्सियाविरुद्ध २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. या सामन्यात गोल करून मेस्सीने एका क्लबकडून खेळताना सर्वाधिक गोल करण्याच्या पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

मेस्सीचे कौतुक करताा पेले लिहीतात, आपले हृदय जेव्हा प्रेमाने ओसंडून वहाते, तेव्हा मार्ग बदलणे कठिण असते. एकच जर्सी तुला सारखी सारखी घालायला का आवडते हे मी जाणतो. जेथे आपल्याला प्रेम मिळते असे घरासारखे दुसरे ठिकाण नाही. फुटबॉल मैदान हे आपले घरच आहे. या ऐतिहासिक यशासाठी मी तुझे अभिनंदन करतो. बार्सिलोनाबरोबरचा तुझा प्रवास खरंच अवर्णनीय आहे. एकाच क्लबसोबत इतका मोठा प्रवास करणं, खरंच खूप कठिण आहे. एखाद्याच्या कारकिर्दीत असं अभावानेच घडतं. होय ! म्हणूनच मी तुला मानतो, माझा तुझ्या कामगिरीला सलाम !’

मेस्सीने ही कामगिरी बार्सिलोनाकडून ७४८ सामन्यात केली. एकूण १७ मोसम तो या एकाच क्लबकडून खेळत आहे. अर्थात, पेले यांनी ही कामगिरी केवळ ६६५ सामन्यात केली. तीन वेळा विश्वकरंडक जिंकणारे पेले हे एकमेव फुटबॉल पटू असून, कारकिर्दीत १,२८३ गोल केल्याच्या त्यांच्या कामगिरीची दखल गिनेस वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. पेले सॅंटोस क्लबसाठी १९७४ मध्ये अखेरचा सामना खेळले. फुटबॉल विश्वातील एक सर्वकालिन महान खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. पेले आज ८० वर्षांचे असून, त्यांनी १९५७ ते १९७१ या कालावधीत ९२ आंतरराष्ट्रीय सामन्यात ब्राझीलसाठी सर्वाधिक ७७ गोल केले. पेले यांचा विक्रम आता मेस्सीच्या दृष्टिक्षेपात आहे. अर्जेंटिनासाठी ३३ वर्षीय मेस्सीने आतापर्यंत ७१ गोल केले आहेत.