युवा मोर्चाच्या ‘एक लाख तरुण आत्मनिर्भर’ संकल्पनेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दाद

0
247

– युवा मोर्चा मराठा समाजासोबत संपूर्ण ताकदीनिशी उभा – अनुप मोरे

पिंपरी,दि. १८ (पीसीबी) :- कोणत्याही क्षेत्रामध्ये यश सहजतेने मिळत नाही, तुम्ही ते काम किती जबाबदारीने करता त्यावरच यश अवलंबून असते. जबाबदारीची भावनाच तुमच्या जीवनाचा उद्देश बनली तर तुम्ही अधिक जबाबदारीने काम करून यशस्वी होऊ शकणार आहात. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही एक महत्त्वाकांक्षी संकल्पना देशात सुरू केली. त्याच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाचे सक्षमीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना दिल्या गेल्या आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जात आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.

आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राच्या मुंबईतील शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, संघटनमंत्री विजयराव पुराणिक, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने महिलां असोत की, दिव्यांग यांच्यासाठी विविध योजना राबविल्या. अगदी राशनवर धान्य पोहोचविण्यापर्यंत ते खात्यात पैसे भरण्यापर्यंत केंद्र सरकारने मदत केली आहे. लॉकडाऊनच्या काळात दीर्घकालीन उपाय योजना राबविल्या. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून आपणाला शेवटच्या स्तरापर्यंत रचनात्मक कार्य करावयाचे आहे. त्यासाठी भाजप पक्ष हा सेतूची भूमिका निभावणार आहे. राज्यात भाजपच्या कार्यकाळात अर्बन हौसिंगमध्ये राज्य प्रथम क्रमांकावर होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते पिछाडीवर पोहोचले आहे. केंद्र सरकारच्या योजना थेट रस्त्यावरच्या कामगारपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, त्यासाठी लोकाभिमुख भूमिका बजावण्याची हीच खरी वेळ आहे. युवा मोर्चाने एक लाख तरुणांना आत्मनिर्भर करावयाचा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत.

”मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टानं हा निर्णय देत राज्य सरकारला पुन्हा दणका दिला आहे. राज्य सरकारला न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आरक्षणाबाबत व्यवस्थित भूमिका मांडता आलेली नाही. खंडपीठासमोर अजूनही सुनावणी सुरुच आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती येण्यापूर्वी ज्या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, त्यांना व ज्या प्रक्रिया सुरु होऊन, अंतिम टप्यात आहेत, अशांना संरक्षण मिळवून देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा  क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठींबा देऊन भारतीय जनता युवा मोर्चा मराठा समाजासोबत संपूर्ण ताकदीनिशी उभा आहे” असे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले.