सनातनच्या वकिलाचा संजय राऊतांच्या हस्ते सत्कार; राष्ट्रवादीची निदर्शने

0
435

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांचा सत्कार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच्यानिषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबईत राऊत यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.  

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संजय राऊतांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या निदर्शनाविरोधात सनातननेही राष्ट्रवादीविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सनातन असे घोषणायुध्द पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘संजय राऊत हाय हाय’च्या घोषणा देण्यात आल्या, तर सनातनकडून ‘राष्ट्रवादी चोर है’ अशा घोषणा दिल्या. या घोषणाबाजी आणि आंदोलनाचा फटका संजय राऊत यांनाही बसला. गर्दीतून त्यांना वाट काढत जावे लागले.

हिंदुत्त्ववाद्यांना निःशुल्क मदत करणाऱ्या संजीव पुनाळेकर यांचा राष्ट्रीय पत्रकार मंचाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे.