सत्ताधाऱ्यांचा न्याय व्यवस्थेवर आणि तपास यंत्रणेवर विश्वास नाही – शरद पवार

0
691

पुणे, दि. २९ (पीसीबी) – देशातील आघाडीची तपास यंत्रणा सीबीआयला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांचा न्याय व्यवस्थेवर आणि तपास यंत्रणेवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना हटवून आपल्या विचाराच्या लोकांना तिथे बसवले जात आहे. सरकारचा हा कारभार देशासाठी घातक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आज (सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संविधान बचाव रॅली काढण्यात आली.  यावेळी पवार बोलत होते. पवारांनी आपल्या भाषणात भाजप सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा एकही निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत लोकशाही मार्गाने सत्ता हिसकावून घेऊ, असे शरद पवार म्हणाले. दुष्काळाच्या झळा सर्वांना बसत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र आहे. पण सगळ्यात जास्त त्रास महिलांना होत आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, मात्र, सरकार निर्णय घेण्यास तयार नाही, अशी टीका पवारांनी यावेळी केली.