सज्जनशक्तीच्या एकत्रीकरणातूनच राष्ट्राचे परम वैभव शक्य – सुरेश उर्फ नानासाहेब जाधव

0
233

– हिंजवडी गटाचा विजयादशमी उत्सव उत्साहात, शहरात विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सश्त्रपूजन सोहळा

पिंपरी, दि.३ (पीसीबी) – राष्ट्राला परम वैभव प्राप्त करून देण्याकरिता समाजातील सज्जनशक्ती एकत्रीत येण्याची गरज असून हेच कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. हिंदू संस्कृतीचा प्रगल्भ वारसा आपल्या देशाला लाभला आहे एवढा मोठा सांस्कृतिक वारसा असूनही परकीय आक्रमणामुळे आम्हाला त्याचा विसर पडला त्यामुळे जुन्या सर्व चांगल्या गोष्टी लक्षात घेऊन हा सांस्कृतिक ठेवा जतन केला पाहिजे असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नानासाहेब जाधव यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी गटाच्या विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पिंपरी चिंचवड शहरात विविध १५ ठिकाणी संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी शहरातील वाकड येथील कांतीलाल खिवसरा शाळेच्या भव्य प्रांगणात सायंकाळी ५ वाजता संपन्न झालेल्या उत्सवात व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नानासाहेब जाधव, ओजस रुग्णालयाचे प्रमुख संचालक डॉ.महेश कुदळे , हिंजवडी गट संघचालक राजेश भुजबळ प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पारंपारिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले यावेळी स्वयंसेवकांनी शारीरिक, घोष, पद्य प्रात्यक्षिके सादर केली यावेळी पूर्ण गणवेशातील संघ स्वयंसेवकांचे शिस्तबध्द शारीरिक कार्यक्रम, प्रात्यक्षिके बघून नागरिक भारावून गेले होते. नानासाहेब जाधव पुढे म्हणाले, विजयादशमी पराक्रम साजरा करण्याचा दिवस असून या दिवशी सीमोल्लंघन केले जाते विविध उदाहरणे देऊन त्यांनी भारतीय संस्कृती, सण उत्सवांचे महत्व विशद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती देखील त्यांनी आपल्या भाषणातून दिली.

प्रमुख अतिथी डॉ.कुदळे यांनी राष्ट्र सर्वोपरी या भावनेतून संघ स्वयंसेवकांचे योगदान, कार्य अभिनंदनीय असून विशेषतः कोरोना काळातील संघ स्वयंसेवकांचे निःस्वार्थ सेवाकार्य अतिशय प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. उत्सवाला परिसरातील स्वयंसेवक, नागरिक, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.