“संत आणि गवळणी यांची भावावस्था एकच होती!” – मधुश्री व्याख्यानमाला – पुष्प पहिले

0
127

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – “संत आणि गवळणी यांची भावावस्था एकच होती!” असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्यात्या पुष्पा नगरकर यांनी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे मंगळवार, दिनांक २३ मे २०२३ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘संतसाहित्यातील गवळणी’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना पुष्पा नगरकर बोलत होत्या. माजी उपमहापौर शैलजा मोरे अध्यक्षस्थानी होत्या; तसेच सामाजिक कार्यकर्ते नीलेश शिंदे, मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्ष माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष डॉ. अर्चना वर्टीकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे शहरातील विविध सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

पुष्पा नगरकर पुढे म्हणाल्या की, “महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिल्यावर ते व्यथित झाले. तेव्हा भीष्माचार्य यांनी त्यांना कृष्णचरित्र लिहिण्यास सांगितले. गवळणी हा कृष्णचरित्रातील अविभाज्य घटक आहे; आणि रासक्रीडा हा त्याचा गाभा आहे. प्रथमदर्शनी शारीरिक आसक्तीतून गवळणी या कृष्णाकडे आकृष्ट झाल्याचे वाटत असले तरी रासक्रीडेच्या माध्यमातून कृष्णाने त्यांना भक्तिमार्गाकडे नेले अन् परब्रह्माचे दर्शन घडविले. गवळणींची भक्ती ही मधुराभक्ती होती. त्यांनी कृष्णाच्या बाललीलांवर विदेही आणि समर्पित भावनेतून प्रेम केले. यशोदेकडे बालकृष्णाच्या तक्रारी करताना त्यांना त्याच्या खोड्यांचे कौतुक वाटायचे. त्या निमित्ताने कृष्णाचे डोळे भरून दर्शन घेता येईल, अशी आस गवळणींच्या मनात असायची.

वास्तविक नंदराजा हा सर्वात मोठा गवळी होता. त्याच्याकडे दूधदुभत्याची लयलूट होती; परंतु कंसाने गोकुळातील दुग्धजन्य पदार्थ मथुरेच्या बाजारात विकायची सक्ती केली होती. या अन्यायाविरुद्ध बालकृष्णाने आपल्या गोपमित्रांच्या मदतीने बंड पुकारले होते. गोकुळातील बालके दूध, दही, तूप खाऊन सशक्त व्हावीत, हा कृष्णाचा हेतू होता. कृष्णप्रेमाने आणि समर्पित भक्तीने गवळणी जशा विरहव्याकूळ होत असत; नेमकी तशीच अवस्था संतांची होती. त्यामुळे ज्ञानेश्वरमाउली, एकनाथमहाराज, गोरा कुंभार, जनाबाई, संत सेना, तुकोबा अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विराणी, भारुडे, गवळणी, अभंग अशा विविध रचनांमधून कृष्णलीलांचे वर्णन करून दर्शवलेली भावावस्था गवळणींच्या मधुराभक्तीचाच प्रत्यय देणारी आहे!” कृष्णचरित्रातील विविध प्रसंगांचे संदर्भ आणि संतसाहित्यातील विविध गवळणी उद्धृत करीत पुष्पा नगरकर यांनी आपल्या विषयाची मांडणी केली.

नीलेश शिंदे यांनी, “निरपेक्षपणे मधुश्री कला आविष्कार ही संस्था कार्यरत आहे, ही स्तुत्य बाब आहे!” असे गौरवोद्गार काढले. शैलजा मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “संघटनशक्तीशिवाय मोठे कार्य सिद्धीस जात नाही!” असे मत व्यक्त केले. सलीम शिकलगार यांनी प्रास्ताविकातून, “तेराव्या वर्षात पदार्पण करणारी मधुश्री व्याख्यानमाला सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने कार्यरत आहे!” अशी भावना व्यक्त केली. डॉ. अर्चना वर्टीकर यांनी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमांची माहिती दिली.

नटराज पूजनाने व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीने संयोजनात परिश्रम घेतले. वर्षा बालगोपाल यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी कुलकर्णी यांनी आभार मानले.