शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला

0
34

दि.१३ (पीसीबी) – आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 1500 अंकांनी घसरत 76 हजारांच्या आसपास व्यवहार करत आहे, तर निफ्टी 450 हून अधिक अंकांनी घसरून 23,590 वर स्थिरावला आहे.

आजच्या व्यवहारात विशेषतः सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली. जागतिक घडामोडींमुळे बाजारावर दबाव वाढल्याचे चित्र आहे.

मध्यपूर्वेतील तणाव हा या घसरणीमागचा प्रमुख कारण ठरत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात 21 तास चाललेली चर्चा निष्फळ ठरल्याने कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा 100 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होताना दिसत आहे.

दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये आतापर्यंत 48,513 कोटी रुपयांची विक्री केल्याने बाजारातील चिंता आणखी वाढली आहे. रुपयाची कमजोरी देखील बाजारासाठी नकारात्मक संकेत देत आहे.

या आठवड्यात येणाऱ्या Q4 निकालांवरही गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. विप्रो, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे निकाल बाजाराची पुढील दिशा ठरवू शकतात.

तसेच, प्राथमिक बाजारातही हालचाल वाढणार असून 17 एप्रिलपासून ‘सिटियस ट्रान्सनेट इन्व्हिट’चा IPO सुरू होणार आहे.एकंदरीत, जागतिक अनिश्चितता, कच्च्या तेलाचे दर आणि एफआयआयची हालचाल यामुळे बाजारात सध्या मोठी अस्थिरता कायम आहे.