शिरूर, मावळमध्ये राष्ट्रासाठी संपत्ती निर्माण करण्याची क्षमता; आढळराव आणि बारणेंनी काय केले नक्की वाचा…

0
1143

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात निसर्गसौंदर्याने संपन्न अनेक धार्मिक व पर्यटन स्थळे, ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान देहू आणि आळंदी याच दोन मतदारसंघांमध्ये येतात. त्यामुळे पर्यटनातून राष्ट्रासाठी संपत्ती आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याची या दोन मतदारसंघात प्रचंड मोठी क्षमता आहे. हिंदुत्व, मराठी आणि शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणारी शिवसेना या दोन्ही मतदारसंघात सतत विजयी झाली आहे. निवडणूक प्रचारात मावळ आणि शिरूरमध्ये खूप मोठा विकास केल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी पर्यटनवाढीला चालना देण्याची क्षमता असणाऱ्या आपापल्या मतदारसंघात राष्ट्रासाठी किती संपत्ती निर्माण केली आणि किती स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला याचा दुर्बिणीतून शोध घ्यावा लागेल, अशी वस्तुस्थिती आहे.

मावळ आणि शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघ निर्ससौंदर्याने संपन्न प्रदेश आहेत. शिरूर मतदारसंघातील थोडासा दुष्काळी परिसर वगळल्यास अनेक महत्त्वाची धार्मिक आणि पर्यटन स्थळे या मतदारसंघात आहेत. भिमाशंकर हे स्थान महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती असलेले श्रद्धास्थान शिरूर लोकसभा मतदारसंघातच आहे. भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकरच्या जवळच मनमाडच्या टेकड्यांवर कोरीव लेण्यात आहेत. येथे अभयारण्य सुद्धा आहे. अष्टविनायकांपैकी थेऊर, ओझर, रांजणगाव ही महाराष्ट्रातील गणेशभक्तांची श्रद्धास्थाने शिरूर लोकसभा मतदारसंघातच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला शिरूर मतदारसंघातच आहे. कोट्यवधी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ही शिरूर लोकसभा मतदारसंघातच आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे आहेत. लोहगड, विसापूर, भादे लेणी, एकवीरा, राजमाची, नागफणी, तुंगी असे अनेक छोटे-मोठे गडकिल्ले मावळ मतदारसंघात आहेत. “भले तरी देवू कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।“, असे म्हणणाऱ्या संत तुकाराम महाराजांची देहू मावळ मतदारसंघात आहे. रायगड जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात निसर्गसंपन्नता आहे. त्यात समुद्र सपाटीने या सौंदर्यात भर घातलेली आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यास शिरूर आणि मावळ हे दोन्ही मतदारसंघ पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचे मतदारसंघ ठरू शकतात.

दोन्ही मतदारसंघात पर्यटनाला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे पर्यटन हा दृष्टीकोन समोर ठेवून विकास केल्यास या दोन्ही मतदारसंघातून राष्ट्रासाठी मोठी संपत्ती निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे स्थानिकांनाही खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतात. परंतु, आपले राज्यकर्ते त्याचा अजिबात विचार करत नाहीत हेच दिसून येत आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने पक्षाचे नाव ठेवलेल्या आणि महाराजांच्या नावानेच राजकारणातील पोळी भाजणाऱ्या शिवसेनेने या बाबींचा आजपर्यंत तरी विचार केलेला दिसत नाही.

शिरूर आणि मावळ या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत शिवसेनाच विजयी होत आली आहे. शिरूरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे तर सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. मावळमध्ये दोन्हीवेळा शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. परंतु, या दोन्ही मतदारसंघातील धार्मिक आणि पर्यटनस्थळांसोबतच गडकिल्ल्यांची अवस्था पाहिल्यास शिवसेनेला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार तरी उरतो का?, असा प्रश्न मतदारांना पडल्याशिवाय राहत नाही. दोन्ही मतदारसंघातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची आजची अवस्था पाहिल्यास शिवसेनेचे दोन्ही खासदार निष्क्रिय आहेत की त्यांच्यात विकासाची दृष्टी आहे, हे लगेच मतदारांच्या लक्षात येते.

शिवसेना पक्ष चालवणाऱ्या ठाकरे कुटुंबांची कुलस्वामिनी एकवीरा देवीचा कार्ला गड मावळ मतदारसंघातच आहे. ठाकरे कुटुंब वर्षातून अनेकदा या गडावर येऊन एकवीरा देवीचे आशिर्वाद घेत असतात. देवीच्या दर्शनाला नेहमी येणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मावळ लोकसभा मतदारसंघातील निसर्गसंपन्नता दिसत नाही का? आणि दिसत असेल तर पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी आपल्या पक्षाच्या खासदारांचे कान पकडता येत नाहीत का?, असे अनेक सवाल आता निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. हिंदुत्व, मराठी आणि शिवाजी महाराजांच्या नावाने वर्षानुवर्षे पोळी भाजण्याऐवजी शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील पर्यटनस्थळे विकसित करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची शिवसेना आणि त्या पक्षाच्या दोन्ही खासदारांमध्ये खरोखरच दूरदृष्टी आहे का?, याचाही दोन्ही मतदारसंघातील मतदार निवडणुकीत मतदान करताना विचार करण्याची शक्यता आहे.