शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांवर शिवाजीराव आढळराव यांच्या तत्काळ आदेश

0
319

मुंबई, दि.३० (पीसीबी) : शिरूर लोकसभा मतदारसंघातील ५ महत्त्वाच्या विषयांशी संबंधित घेतलेल्या विशेष बैठकीतील निर्णयांची तत्काळ अंमलबजावणीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित खात्यांसह सर्व संबंधित विषयांशी संलग्न १६ खात्यांच्या अतिरिक्त व प्रधान सचिवांसह पुणे जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहेत. या सर्व आदेशांना कार्यवाही मुदत पुढील चार आठवडे दिली आहे, अशी माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिली.

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील सुधारित विकास आराखड्याला धर्मवीर नाव देवून तिथे लष्कर भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासह आढळराव यांच्या मागणीनुसार आराखड्यात तत्काळ बदल करण्यासाठीचे आदेश राज्याचा नियोजन विभाग व पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. खेड (ता. खेड) पंचायत समितीची इमारत मुळ शासकीय आदेशानुसार व मुळ नियोजित जागेवर उभारण्यासाठीच्या कार्यवाहीचे आदेश ग्रामविकास, महसूल, सार्वजनिक बांधकाम व वन विभागाला दिले. खानापूर (ता. जुन्नर) येथील कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्प सुरू करण्याबाबत आदिवासी विकास, पणन, वस्त्रोद्योग व सहकार विभागाला दिले. आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथे बिबट सफारी प्रकल्पाबाबत जागेची फेरतपासणी करून तत्काळ पुढील कार्यवाही करण्याचे आदेश महसूल, वन विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना दिले. पूर (ता. जुन्नर) येथील आदिवासी दैवत कुकडेश्वर मंदिर जतन-संवर्धनासाठी परीक्षण अहवाल तत्काळ देण्याचे आदेश पर्यटन, सांस्कृतिक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाला दिले.

शिरूर बाजार समितीबाबत निवेदन
करंदीच्या सरपंच सोनाली बंटी ढोकले, कालवा समितीचे सदस्य राजाभाऊ ढोकले व ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार करंदीतील प्रलंबीत रस्त्यांचे मागणीपत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाममंत्री व तत्सम सर्व खातेप्रमुखांना मंगळवारी (ता. २७) दिल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. तसेच, शिरूर बाजार समितीच्या एका गंभीर प्रश्नाबाबतचे एक निवेदन करंदीमधूनच दिले गेले आहे. याबाबतही आपण थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.