शिक्षण सोडल्यानंतरच मिळते ‘हि’ कोट्यवधींची ‘स्कॉलरशिप’! याच स्कॉलरशिपच्या जोरावर उभा झालाय ‘ओयोरूम्स’ ब्रँड!

0
533

– कशी आणि कोणती आहे हि स्कॉलरशिप?

बर्‍याच जणांना ‘ओयोरूम्स’ बद्दल माहिती असेल. लोकांना अगदी अफोर्डेबल किमतीमध्ये होटेल रूम उपलब्ध व्हावी याकरिता ‘ओयोरूम्स’ ही संकल्पना वयाच्या एकविसाव्या वर्षी रितेश अग्रवाल या दिल्लीतील तरुणाने अस्तित्वात आणली. रितेशने वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत बराच भारत फिरून पालता घातला होता. दरम्यान त्यावेळेस त्याला हे कळलं कि, लोकांना परवडेल अशा किमतीत हॉटेल्स उपलब्ध नाहीत. आपण यावरती काही करू शकतो असा विचार त्याच्या मनाला शिवला आणि यासाठी त्याने अनेक जागा शोधून काढल्या, हॉटेल्स हेरून ठेवले होते. पण हे चालू करण्यासाठी भांडवल मात्र फारसे नव्हते.त्याच वेळेस रितेशने ‘थियाल फेलोशिप’ मिळवण्यासाठी अर्ज केला आणि आपल्या प्रोजेक्टची सर्व माहिती माहिती दिली. त्यावरूनच त्याला ती फेलोशिप मिळाली, जी दोन वर्षात एक कोटी रुपये देते. आणि त्याचाच फायदा रितेशने घेतला आणि त्याच्या कल्पनेतील ‘ओयोरूम्स’ प्रत्यक्षात अस्तित्वात आल्या. आज तो २०२० मधील जगातील सर्वात तरुण श्रीमंत उद्योजक म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये त्याची तब्बल २०० हॉटेल्स आहेत. तसंच जगभर देखील त्याचा व्यवसाय आत्तापर्यन्त पसरला आहे आणि पुढेही पसरत आहे. रितेशला ही कामगिरी करता आली जेव्हा रितेशला ती थियाल फेलोशिप मिळाल्यामुळे. ही फेलोशिप मिळवणारा रितेश हा पहिला भारतीय ठरला आहे.

पण बऱ्याच जणांना या ‘थियाल फेलोशिप’ बद्दल काही माहित नाहीये. तर जाणून घेऊयात नक्की काय आहे हि ‘थियाल फेलोशिप’? आणि जर का हि फेलोशिप जर चक्क $१००००० देत असेल तर ही नक्कीच काहीतरी भन्नाट असणार आहे हे पक्के.ज्यांच वय १७ ते २३ आहे. जे हरहुन्नरी आहेत, वेगळं काहीतरी करण्याची टशन ज्यांच्यामध्ये आहे, आपल्या कल्पना अस्तित्वात आणण्यासाठी ज्यांनी शाळा कॉलेजला सोडचिट्ठी दिली आहे. शालेय ज्ञानापेक्षा व्यवहारिक ज्ञान ज्यांच्याकडे आहे, वेगवेगळ्या क्षेत्राबाबत भन्नाट कल्पना आहेत आणि ज्यांचा ह्याच कल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी आपल्या हिमतीवर पूर्णपणे विश्वास आहे, अशी कोणतीही व्यक्ती ही फेलोशिप मिळावी याकरिता अर्ज करू शकते.

पेपल(paypal) ज्यांनी विकत घेतलं तेच पीटर थियाल. तंत्रज्ञान उद्योजक आणि गुंतवणूकदार पीटर थियाल यांनी ही ‘थियाल फेलोशिप’ चालू केली. २०११ साली पीटर यांनी ही फेलोशिप सुरु केली. या फेलोशिप मध्ये तब्बल एक लाख अमेरिकन डॉलर दिले जातात. ज्यांना काहीतरी वेगळं करायचा आहे, परंतु आर्थिक पाठबळ नाही, त्यांना ही फेलोशिप मदत करते. दोन वर्षाच्या कालावधी मध्ये टप्प्याटप्प्याने ही फेलोशिप मदत स्वरूपात केली जाते. एवढच नाही तर ज्याला ही मदत केली जाते. त्याला त्याच्या अडलेल्या प्रश्नांवरती तज्ञांकडून मार्गदर्शन सुद्धा केलं जातं. परंतु, कोणतेही सल्ले मात्र दिले जात नाहीत. यासाठी एकच अट अशी आहे कि, आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्कॉलरशिप मिळालेल्या व्यक्तीने शाळा किंवा कॉलेज सोडून देणे अनिवार्य असते. शाळा-कॉलेज सोडणे हीच या फेलोशिपची सर्वात महत्त्वाची अट आहे.

या ‘फेलोशिप’चे हेच उद्देश आहे कि, ‘कुठल्याही शालेय शिक्षणाशिवाय, एक ठराविक साचेबद्ध अभ्यासाशिवाय माणूस प्रगती करू शकतो, आपल्या कल्पना राबवू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचे आहे’. कारण, शालेय शिक्षणामुळे माणूस एका चौकटीत अडकतो. एकाच प्रकारचा विचार करतो. नवीन वेगवेगळ्या कल्पना त्याला सुचत नाहीत. असा एक विचार या फेलोशिप देणाऱ्या लोकांनी केलेला आहे. ज्याला करिअरची वेगळी वाट निवडायची असेल तर ती त्यांना पुढे येणाऱ्या अपयशाच्या भीतीमुळे, अनिश्चिततेमुळे निवडता येत नाही. अशाच काही वेगळ्या आयडिया असणाऱ्या आणि तरुण, होतकरू, झटून पूर्णपणे सचोटीने काम करण्याची आवड असणाऱ्या मुला-मुलींना खंबीरपणे पाठिंबा देण्याची गरज असते आणि तीच गरज या थियाल फेलोशिपमुळे पूर्ण होते.

या फेलोशिपद्वारे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन, मदतही मिळते. जर आपली आयडिया खरोखरच चांगली असेल तर आपल्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदार, पार्टनर, ग्राहक यांच्याशी देखील ओळख करून दिली जाते. या सगळ्यांचा उपयोग आपल्या प्रोजेक्टसाठी कसा करायचा हे मात्र त्या तरुण-तरुणींनीच ठरवले पाहिजे, कारण, याबाबतीत मात्र ते दक्ष असतात. त्यामुळे हे तरुण अत्यंत हिरिरीने आपली आयडिया अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करतात. यातून उद्योजक तयार व्हावेत हीच फेलोशिप देणाऱ्यांची भावना आहे. अर्थातच हि एवढी मोठी फेलोशिप ते देणार यासाठी आपण काही अटी पूर्ण करणे महत्त्वाचे असते. एक तर आपण पाहिलेच की शाळा, कॉलेज सोडून द्यावे लागते. त्यामुळे तुमचं शिक्षण, शिक्षणातला करियर किती आहे हे सांगून काहीही उपयोग नाही. कारण, आपण यूनिवर्सिटी टॉपर जरी असलो तरीही त्यांना त्याचा फरक पडत नाही. तसेच फेलोशिप देणाऱ्यांकडून देखील कुठल्याही प्रकारचे ट्रेनिंग दिले जात नाही.

पण जर आपली आयडिया इतरांपेक्षा किती वेगळी आणि भन्नाट आहे हे त्या उमेदवाराला पटवून देणे गरजेचे असते. आत्तापर्यंत तुमची ही आयडीया अस्तित्वात आणण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केलेत हे देखील त्यांना सांगावे लागते. केलेले काम सादर करावे लागते. आणि हे करताना तुम्ही कुठल्याही देशातले असलात तरीदेखील चालते. तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहात याचा काहीही फरक पडत नाही. जगभरातील १७ – २३ वयोगटातील कोणीही व्यक्ती ही फेलोशिप मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असते. आपण आहोत तिथून आपल्या आयडियावर काम करू शकतो. जगभरातून अनेक विद्यार्थी या फेलोशिपसाठी अर्ज करतात. परंतु ही फेलोशिप, जितके अर्ज येतात त्याच्या फक्त ०.१% टक्के लोकांनाच मिळते. म्हणजेच फार तर जगभरातून फक्त २० ते २५ लोकांनाच ही फेलोशिप मिळते.

यावरूनच हा अंदाज येतो कि, ही फेलोशिप मिळवणे किती कठीण आहे. ही फेलोशिप कितीही चांगली वाटत असली तरी यातही काही त्रुटी आहेतच. अर्थात आत्ता पर्यंत ज्यांना ज्यांना हि फेलोशिप मिळाली आहे तो प्रत्येक जण यशस्वी झाला आहे असे नाही. शिवाय दोन वर्षे शिक्षण सोडावे लागत असल्यामुळे तो तोटा देखील आहेच. कारण बाहेरच्या जगात शेवटी तुमच्या शिक्षणाला महत्त्व आहे. दोन वर्ष शिक्षणामध्ये खंड पडतो आणि जर फेलोशिप मिळूनही आयडिया राबवण्यात अपयश आलं तर त्यातून एखाद्या व्यक्तीला नैराश्य देखील येऊ शकत. परंतु, वेगळं काही करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक नक्कीच संधी आहे. यातील बरेचसे उमेदवार हे हार्वर्ड आणि एम आय टी सारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीतून ड्रॉप आऊट झालेले विद्यार्थी आहेत.

म्हणूनच जेव्हा भारतातील रितेश अग्रवालला ही फेलोशिप मिळाली तेव्हा त्याने स्वतःचं शिक्षण सोडलं आणि आपल्या ओयोरूम वर काम चालू केलं. त्याच्या घरचे खरं तर त्याच्या या निर्णयाशी सहमत नव्हते. शिक्षण सोडणे त्यांना मान्य नव्हतं. याबाबत बोलताना रितेश म्हणतो की, ”फेलोशिपच्या जाणकारांनी जेव्हा त्यांना माझं आणि माझ्या प्रोजेक्टमधल पोटेन्शिअल सांगितलं आणि मिळणारी रक्कमही सांगितली. ते ऐकून माझ्या घरचे आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी मला काम करण्याची परवानगी दिली.” आज तो भारतातील यशस्वी तरुण उद्योजक म्हणून गणला जातो. भारतापुरता विचार करायचा झाला तर दिवांक सिंग तोमर ही फेलोशिप मिळवणारी दुसरी व्यक्ती आहे. त्याला वयाच्या १९ व्या वर्षी ही फेलोशिप मिळाली. ऑनलाईन शिक्षणासाठी प्लॅटफॉर्म तयार करायचा त्याचा विचार होता. त्यासाठी त्यांने आपले शिक्षणदेखील सोडले होते.

दिवांक सिंग तोमर हा ऑनलाइन हॅकर आणि अभियंता आहे. त्याच वेळेस त्याला ही फेलोशिप मिळाली. आता तो ऑनलाइन शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. आत्तापर्यंत ही फेलोशिप मिळवणाऱ्या लोकांनी फायनान्शिअल, रिअल इस्टेट, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी, नॅनो टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर, क्रिप्टो करेंसी, स्पेस टेक्नॉलॉजी, लॉजिस्टिक टेक्नॉलॉजी, सामाजिक, पर्यावरण या क्षेत्रात काम केले आहे आणि नवीन रोजगार देखील उपलब्ध केला आहे. हे वैविध्य पाहिलं तर या फेलोशिपची उपयुक्तताही लक्षात येते.