“राष्ट्र आणि राष्ट्रहित प्रथम हे सैनिकांचे ब्रीद!” – निवृत्त ब्रिगेडियर मधुकर प्रचंड

0
24
  • डीनर विथ सोल्जर्स उपक्रमात श्रोते युद्धकथांमध्ये तल्लीन

पिंपरी – “राष्ट्र आणि राष्ट्रहित प्रथम हे सैनिकांचे ब्रीद असते आणि निवृत्तीनंतरही ते प्राणपणाने जोपासण्याचा प्रत्येक सैनिक प्रयत्न करीत असतो!” असे विचार निवृत्त ब्रिगेडियर मधुकर प्रचंड यांनी श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक २४, लोकमान्य हॉस्पिटल मागे, प्राधिकरण येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे जिल्हा भारतीय भूतपूर्व सैनिक संघ आणि श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डीनर विथ सोल्जर्स अर्थात सैनिकांसोबत स्नेहभोजन या विशेष उपक्रमात सार्जंट जयंत टोपे, हेमंत काजळे, धनंजय लोखंडे, डी. आर. पडवळ, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, राष्ट्रवादी (अजित पवार गटाच्या) प्रदेश सचिव शीला भोंडवे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शैला पाचपुते, शहर संघटिका सरिता साने, सलीम शिकलगार, विजय शिनकर, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भगवान महाजन, पुणे जिल्हा भारतीय भूतपूर्व सैनिक संघाचे मानद सचिव दत्तात्रय कुलकर्णी, श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे, मुख्य संयोजक चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमात स्वागत करताना दत्तात्रय कुलकर्णी म्हणाले की, “०४ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय नौदलाने कराची येथे केलेल्या आक्रमणात पाकिस्तानच्या पाच जहाजांचा पूर्णपणे बीमोड करण्यात आला होता. मी त्या कारवाईत सहभागी असल्याने त्या भाग्यवान क्षणांच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत!”

याप्रसंगी उपस्थित असलेल्या भूदल, नौदल आणि वायुसेनेत विविध पदांच्या माध्यमातून देशासाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांनी उत्स्फूर्तपणे भारत – पाक युद्ध, बांगलादेश मुक्ती युद्ध, श्रीलंकेत पाठवलेली शांतीसेना तसेच कारगिल युद्ध यामधील आपले रोमांचक अनुभवकथन करून श्रोत्यांना खिळवून ठेवले.

चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत मुथियान यांनी मतदान करण्याविषयी सामुदायिक शपथ दिली. माजी सैनिकांच्या हस्ते सामुदायिक महाआरती करण्यात आली. चक्रव्यूह मित्रमंडळाने संयोजनात विशेष सहकार्य केले. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. राजू मोरे यांनी आभार मानले. सुरुची स्नेहभोजनाने उपक्रमाची सांगता करण्यात आली.