शरद पवार यांचे कट्टर समर्थक असूनही राष्ट्रवादी विरोधात पाय रोवून लढले

0
342

पिंपरी , दि. ३ (पीसीबी) -भाजपचे दमदार आमदार म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मण जगताप यांची आज सकाळी प्राणज्योत मावळली. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी ते भाजप असा प्रवास राहिलेल्या जगताप आजारी असतानाही पुन्हा चर्चेत आले ते राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी हजर राहिले त्यावेळी. प्रचंड आजारी असतानाही ते व्हीलचेअरवर मतदानासाठी हजर राहिले होते. कुस्तीच्या फडात अनेकांना चितपट केलेल्या जगतापांनी राजकारणातही अनेकांना चितपट केलंय. राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक असतानाही त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवली होती.

सलग २० वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक असलेल्या जगतापांनी २००९ साली राष्ट्रवादीने तिकीट दिलं नसतानाही अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर २०१४ मध्येसुद्धा राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं नसताना त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या राज ठाकरेंचा जाहीर पाठिंबा लाभला होता. त्यावेळचा हा किस्सा. लक्ष्मण जगताप म्हणजे पिंपरी चिंचवडमधील राजकारणातील अनभिषक्त सम्राट. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना राजकारणातला हेडमास्तर म्हटलं जातं. पिंपरी चिंचवडचा कारभार त्यांनी अनेक वर्षे एकहाती संभाळला आहे. ते १९८६ पासून २००६ पर्यंत राजकारणात आहे. ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सलग २० वर्षे नगरसेवक होते. १९९३ ला ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले त्यानंतर ते २००२ मध्ये महापालिकेचे महापौर झाले होते.

ते सुरूवातीपासूनच राष्ट्रवादीचे हक्काचे नेते होते. पण २००९ साली विधानसभेसाठी तिकीट न मिळाल्याने त्यांनी थेट पवारांशी पंगा घेत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि निवडूनही आले होते. पण निकाल लागल्यावर त्यांनी परत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध जोरदार बंड करणे ही लक्ष्मण जगताप यांची खासियत होती. मग समोर कितीही मोठा नेता का असेना.

पण त्यांची खरी इच्छा होती खासदारकीची. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष लढण्याचा निर्धार केला. त्यांनी पुन्हा एकदा पवारांशी पंगा घेत मावळ लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला होता. पण त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीने सेनेचे प्रवक्ते असणाऱ्या राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीमध्ये आणून मावळ मध्ये उभं केलं. तर शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली होती. पण पारड मात्र लक्ष्मण जगतापांच्या बाजूने झुकलेलं होतं. अशातच या रणधुमाळीत एंट्री झाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची.