शरद पवार, उध्दव ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली

0
279

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुरु असलेल्या कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर आज (3 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. ही बैठक जवळपास 1 तास सुरु होती. या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. ही बैठक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे झाली.

दरम्यान, याआधी महाविकास आघाडीतील नेत्यांच्याही भेटीगाठी झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. परस्पर लॉकडाऊन वाढवल्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर काल (2 जुलै) संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक झाली. यात लॉकडाऊन, राज्याच्या आर्थिक प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. आधी निर्णय प्रक्रियेबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची तशी भावना झाल्याने, महाविकास आघाडीतील कुरबुरी वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता झालेल्या पवार-ठाकरे भेटीत यावर काही तोडगा निघाला का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाणे,नवी मुंबईतील लॉकडाऊन इतका कडक अपेक्षित नव्हता, कोरोनाच्या बंद प्रमाणेच व्यावसायिकांचाही विचार महत्वाचा आहे, असे मत आहे. त्याशिवाय कंटेन्मेंट झोनचा परिघ दोन किलोमीटर असावी की नसावा यावरही तीव्र मतभेद आहेत. पवार यांच्या भेटीनंतर त्या नियमांत बदल अपेक्षित आहेत.

आधी काँग्रेसची खदखद
यापूर्वी उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. नुकत्याच झालेल्या भेटीतील मागण्यांवर अद्याप कार्यवाही झाली नसल्याचं काँग्रेसमधील काहींचं मत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सत्तेत येऊन आता जवळपास सात महिने झाले आहेत. मात्र यादरम्यान महाविकास आघाडीतील कुरबुरीच्या काही घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी सत्तेत सहभागी असलो तरी निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याची भावना उघड बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीनंतर आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याची प्रतिक्रिया दोन्ही काँग्रेस नेत्यांनी दिली होती