विश्वकरंडक बॉक्सिंग स्पर्धेत अमित पंघलला सुवर्णपदक

0
190

नवी दिल्ली,दि.२०(पीसीबी) – जागितक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता भारताचा बॉक्सर अमित पंघल याने ५२ किलो वजन गटात कलोन येथे सुरू असलेल्या विश्वकरंडक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. त्याचवेळी जखमी सतिश कुमारला ९१ किलोपेक्षा अधिक वजन गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

अमितला सुवर्णपदकासाठी फारसे कष्ट पडले नाहीत. सुवर्णपदकाच्या लढतीत अमितला जर्मनीच्या अर्गिष्टी याने पुढे चाल दिली. फ्रान्सच्या जामिली दिनी मोईंझे याला हरवून सतिश कुमारने अंतिम फेरी गाठली होती. पण, त्याला अंतिम फेरीत जर्मनीच्या नेलव्हिए तियाफॅकविरुद्ध दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.

भारताच्या साक्षी आणि मनिषा यांनी ५७ किलो वजनी गटातून अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचे एक सुवर्णपदक निश्चित आहे. या दोघींमध्ये उद्या शनिवारी अंतिम लढत होईल. मनिषाने उपांत्य फेरीत जागतिक स्पर्धेतील दोन वेळा रौप्यपदक विजेत्या भारताच्याच सोनिया लॅथर हिचा ५-० असा पराभव केला. साक्षीला मात्र जर्मनीच्या रामोना ग्राफ हिने प्रतिकार केला. पण, साक्षीने ४-१ अशी बाजी मारली.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेती पूजा राय हिला येथेही ब्रॉंझपदकावरच समाधान मानावे लागले. तिला नेदरलॅंडसच्या नौचका फॉंटिन हिने पराभूत केले. पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात मोहंमद हुस्सामुद्दिन आणि गौरव सोळंकी यांना ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. हुस्सामुद्दिनला जर्मनीच्या हम्सात सहाडालोव, तर गौरवला फ्रान्सच्या सॅम्युएल किस्तोहरी याने पराभूत केले.

या स्पर्धेत बोल्जियम, क्रोएशिया, डेन्मार्क, फ्रान्स, मोल्डोवा, नेदलरलॅंडस, पोलंड आणि युक्रेन या देशातील स्पर्धक सहभागी झाले आहेत.