चुकलोय खरे, पण राईचा पर्वत करू नका

0
312

अ‍ॅडलेड, दि.१९ (पीसीबी) : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात भारतीय संघाची कामगिरी एका क्षणी अशी काही कोसळली की त्यांना थेट पराभवाची नामुष्की ओठवून घ्यावी लागली. हा पराभव कर्णधार या नात्याने विराट कोहली याच्या जिव्हारी लागला. चाहत्यांची माफी मागताना त्याने जरा धीराने घ्या अशी विनवणी केली आहे. तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव १ बाद ९ धावसंख्येवरून ६ बाद १९ असा अडचणीत आला आणि नंतर ३६ धावांत कोसळला. पहिल्या डावात आघाडी मिळविल्यानंतरही भारताला त्याचा फायदा उठवता आला नाही. या सुमार कामगिरीने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत आला तेव्हाच विराट कोहलीचा चेहराच सारे काही सांगत होता. चुकलोय खरे, आमची फलंदाजी सुमार झाली. पण, धीराने घ्या उगाच राईचा पर्वत करू नका असे त्याने सांगितले. पहिल्या डावात मिळविलेल्या आघाडीचा फायदा उठवण्यात आमचे फलंदाज कमी पडले. अर्थात, त्याने कुणाचे नाव घेतले नाही. पण, त्याचा रोष फलंदाजीच्या सुमार प्रदर्शनाकडे होता. कोहली म्हणाला,’आमची याच्यापेक्षा सुमार फलंदाजी कधी झाली असेल असे वाटत नाही. आम्हाला आता आजचा दिवस विसरुन पुढे जायचे आहे. आमचे खेळाडू यातून बाहेर पडलेले नक्की दिसतील आणि त्यांची खरी ओळख दाखवून देतील.’

या खराब कामगिरीचा बचाव करण्याचा विराटचा प्रयत्न चांगला होता. पण, तो आपल्या वेदना चेहऱ्यावरून लपवू शकला नाही. तो म्हणाला,’माझ्या मते हे सगळे विचित्र आहे. कल्पनाच करवत नाही. चेंडू फार काही मुव्ह होत नव्हता, तरी आमचे फलंदाज योग्य हेतुने खेळले नाहीत. खेळपट्टीवर उभे राहिले असले, तरी चालले असते. अर्थात, हे सगळे इतक्या झटपट घडले की काही समजायच्या आत आमचा डाव आटोपला होती.’ ही धोक्याची वगैरे घंटा आहे असे मला वाटत नाही. आम्ही येथेच एकत्र बसू आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू. एका अपयशाने इतके खचून जाण्याचे कारण नाही.
-विराट कोहली, भारताचा कर्णधार

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशात आम्ही नेहमीच निराशाजनक कामगिरी करतो असा उल्लेख केला जातोय. पण, तसे नाही गेल्या आठ ते नऊ वर्षांत आम्ही केवळ सहा सामन्यात खराब कामगिरी केली असे कोहलीने सांगतिले. तो म्हणाला,’तुम्ही फक्त अपयशाबद्दल बोलता. यशाबद्दल कुणीच बोलत नाही. भारतीय फलंदाजी प्रत्येक वेळेस कोसळणार असे नाही. पण, जेव्हा कोसळते तेव्हा आम्हाला त्या चुका मान्य कराव्या लागतात आणि त्यावर काम करावे लागते आणि ते आम्ही करतच असतो. हे काही क्लब क्रिकेट नाही. येथे प्रचंड दडपण असते. आम्ही देशाचे प्रतिनिधीत्व करत असतो. खराब कामगिरी करायला काही आम्हाला आवडत नाही. चुका झाल्या आणि आम्हाला त्या मान्य आहेत.’

क्रिकेटपटू थकल्याचा मुद्दाही त्याने या वेळी खोडून काढला. तो म्हणाला,’आम्ही १ बाद ९ धावसंख्येवरून खेळायला पुढे सुरवात केली तेव्हा आमचे सर्व खेळाडू फ्रेश होते. आम्ही अधिक चांगली फलंदाजी करणे अपेक्षित होते. पण, दुर्दैवाने ते झाले नाही. या मागे काही कारण आहे असे मला वाटत नाही. खेळाडू थकले होते असे म्हणक असाल, ते मान्य करुच शकत नाही. हेझलवूड आणि कमिन्स यांनी कमालीची अचूक गोलंदाजी केली. त्यांचे श्रेय हिरावून घेता येणार नाही. कोहलीने जाता जाता दुसऱ्या दिवसाच्या क्षेत्ररक्षणावर न कळत ताशेरे ओढले. तो म्हणाला,’ऑस्ट्रेलिया ७ बाद ११७ असे अडचणीत असताना त्यांनी १९१ म्हणजे खूप मजल मारली. त्यांच्या तळातील फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केली. अर्थात, आम्ही झेल सोडले नसते, तर चित्र वेगळे दिसले असते.’ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कोहलीची ही अखेरची पत्रकार परिषद होती. पत्नी अनुष्का बाळाला जन्म देणार आहे, यासाठी विराट पितृत्वाच्या सुटीसाठी मायदेशी परतणार आहे.