सायक्लाथॉन रॅलीस उस्फूर्त प्रतिसाद

0
198

पिंपरी,दि.२०(पीसीबी) – ‘स्वच्छ भारत -स्वस्थ भारत ‘ या केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत केन्द्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयामार्फत ‘ इंडिया सायकल्स फॉर चेंज ‘ या सायकलरॅलीत सुमारे १५००हून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. समाजामध्ये हवा – ध्वनी प्रदुषण टाळून – इंधन बचतीबरोबरच उत्तम आरोग्य राखण्यासाठी सायकल चालवण्याची गरज व महत्व पटवून देण्यासाठी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सहभागाने सांगवी फाटा – जगताप डेअरी (साई चौक) – सांगवी फाटा यामार्गावर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उदघाटन पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर सौ. माई ढोरे व लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४डी -२चे प्रांतपाल अभय शास्त्री यांच्या हस्ते झाले.

आ. लक्ष्मण जगताप, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पो. उपायुक्त भोईटे सो, सहाय्यक पो. आयुक्त दिसले सो, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे ब्रिगेडियर आर.पी. कटोच यांच्यासह वाहतुक विभागाचे सर्व अधिकारी, पिंपरी -चिंचवड मोटार परिवहन विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.पोलीस प्रांत मित्र संघटना, अविरत श्रमदान, पिसीएमसी सायकल असोशिएशन या संघटना या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

समाजात विशेषत: आजच्या तरुणांमध्ये कोविड साथीच्या काळात व्यायामाचे महत्व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किती महत्त्वाचे आहे, त्याबरोबरच इंधन बचतीचा संदेश पर्यावरण राखण्यासाठी आवश्यक आहे हे या रॅलीमार्फत करण्यात आला.

याप्रसंगी पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा आंतरराष्ट्रीय ट्रायथॅलॉन स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ‘ उर्जा बचत – हवा- ध्वनी प्रदुषणापासून बचत हाच निरोगी आरोग्याचा मूलमंत्र आहे ‘ रुजवण्याचा प्रयत्न या रॅलीतून करण्यात आला.