विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान

0
416

पिंपरी, दि. 1 (पीसीबी): सिग्नलला थांबलेल्या टेम्पोवर पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने पुढील पाच वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातात सातही वाहनांचे 1 लाख 85  हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आज, बुधवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास नऱ्हे येथील नवले पुलाजवळ हा अपघात घडला.

या प्रकरणी धीरज देविदास लोखंडे (वय 26, सावंत विहार, कात्रज, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक दशरत राठोड (वय:24 , रा. सुगुरा, ता. चितापूर , जि . गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी लोखंडे कारने वडिलांना देहू येथे कामाला सोडण्यासाठी जात होते. नऱ्हे येथील नवले पुलाजवळ सिग्नल लागल्याने त्यांनी कार थांबविली. त्यावेळी पाठीमागून नॅनो कारने त्यांच्या कारला धडक दिली. लोखंडे यांनी खाली उतरून पाहिले असता एका ट्रकने पुढे असणाऱ्या टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने टेम्पो वेगाने पुढे गेला. त्यामुळे पुढील नॅनो कार, मारुती वॅग्नर, टेम्पो ही वाहने एकमेकांवर आदळली.

या अपघातात पाच वाहनांचे नुकसान झाले. ट्रक चालकाने हयगयीने, भरधाव वेगाने चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने वरील सर्व वाहने ऐकमेकांवर आदळून व धडकून या सर्व वाहनांचे 1 लाख 85  हजार रुपयांचे नुकसान केल्याने सदर ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या विचित्र अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पोलीस हवालदार विकास मते पुढील तपास करीत आहेत.