“जर विठ्ठल सगळं करणार असेल तर तुमची गरज काय? – विनायक मेटे

0
364

नाशिक,दि.०१(पीसीबी) – “जर विठ्ठल सगळं करणार असेल तर तुमची गरज काय?” असा सवाल करत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. बळीराजाला सुखी कर, कोरोनाचे संकट दूर कर अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठू माऊलींच्या चरणी केली. यावरुन विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

“महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आणि काळजी घेण्यात अपयशी ठरले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात ठाकरे सरकार सपशेल फेल ठरले आहे. या काळात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारने खाजगी रुग्णालय ताब्यात घ्यावी. त्यांनी चाचण्या कमी केल्या आणि रुग्ण संख्या कमी दाखविण्याकडे जास्त लक्ष दिलं आहे,” अशीही टीका विनायक मेटेंनी केली.

“मराठा आंदोलनात अनेकांवर केसेस झाल्या त्याबाबत काही निर्णय घेत नाही. अनेक केसेस तश्याच पडून आहे. ज्यांचं बलिदान दिले त्यासाठी तत्कालीन मदत करण्याची घोषणा केली. मात्र त्याबद्दल हे सरकार काहीच करत नाही. कोपर्डीच्या बहिणीला न्याय अजून नाही. मराठा समाजाच्या विरोधात हे सरकार असल्यावाटून राहत नाही. या सरकारमधील मराठे नेते 2014 च्या आधी चुका करत होते. ते आता सहा महिन्यांत सुरू झाल्या,” असेही मेटे यावेळी म्हणाले.

दरम्यान, “मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवर चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणं अशक्य आहे. मेडिकल प्रवेशाबाबतच सुनावणी घ्यायला पाहिजे,” अशी राज्य सरकारला विनंती मेटेंनी केली आहे. “उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी लक्ष दिलं पाहिजे. या सरकारने एकही बैठक घेतली नाही, मराठा समाजाकडे अत्यंत दुर्लक्ष केलं आहे,” अशी टीकाही विनायक मेटेंनी यावेळी केली.