‘वायसीएमएच’च्या कपडे धुलाईत ५२ लाखाचा वाढीव खर्च

0
223

पिंपरी, दि. ११ ( पीसीबी) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील डॉक्टर, परिचारीका, वॉर्डबॉय यांच्यासह रूग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या कपडे धुलाईसाठी तरतुद मर्यादा कमी पडत आहे. त्यामुळे सात महिन्यांच्या कपडे धुलाईपोटी ठेकेदारावर ५२ लाखाचा वाढीव खर्च करण्यात येणार आहे. नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेचे शहरात २८ दवाखाने आहेत. तर, १२ रूग्णालये आहेत. त्यामध्ये ७५० खाटांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयाचाही समावेश आहे. वायसीएम रूग्णालयामधील डॉक्टर, परिचारीका, वॉर्डबॉय यांच्यासह रूग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांची धुलाई ठेकेदारामार्फत करण्यात येते. त्यासाठी मध्यवर्ती साहित्य भांडार विभागामार्पâत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. लघुत्तम दराने निविदा सादर केलेल्या साई सेवा एंटरप्रायजेस यांच्यासमवेत १ जानेवारी २०२० रोजी करारनामा करण्यात आला.

तीन वर्षे कालावधीकरिता वायसीएम रूग्णालयातील कपडे धुलाई करण्यासाठी त्यांना २ कोटी १० लाख रूपये खर्चास मान्यता देण्यात आली. त्यानुसार, मे २०२० पर्यंत एकूण २ कोटी ९ लाख ६२ हजार रूपये एवढा खर्च झाला आहे. या कामाची मुदत डिसेंबर २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे होणाऱ्या वाढीव खर्चास मंजुरी घेणे आवश्यक आहे. मासिक सरासरी धुलाई बील ७ लाख ५० हजार रूपये ग्राह्य धरून जून २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी एवूâण ५२ लाख ५० हजार रूपये वाढीव खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, या खर्चास मान्यता मिळण्यासाठी हा विषय स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

धुलाई मशीन दुरूस्तीसाठी साडेसात लाखाचा खर्च
वायसीएम लॉण्ड्री विभागातील धुलाई मशीन अचानक बंद पडल्या आहेत. त्यासाठी तातडीची बाब म्हणून रूग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी ठेकेदारीवरील लॉण्ड्री चालक साईसेवा एंटरप्रायजेस यांना मशीन दुरूस्त करण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार, त्यांनी धुलाई मशीन दुरूस्त केली. या दुरूस्तीचे एकूण ७ लाख ६८ हजार रूपयांचे दरपत्रक त्यांनी सादर केले. या दरपत्रकाबाबत बायोमेडीकल इंजिनिअरींग विभागाचा अभिप्राय घेण्यात आला. त्यानुसार, साईसेवा एंटरप्रायजेस यांच्याकडून निविदा न मागवता आणि करारनामा न करता थेट पद्धतीने त्यांना ७ लाख ६८ हजार रूपये देण्यात येणार आहेत.