वाकडमध्ये चौघा चोरट्यांनी बिग बास्केटच्या डिलिव्हरी बॉयला लुटले; ३१ हजारांचा ऐवज केला लंपास

0
548

वाकड, दि. ११ (पीसीबी) – धारदार शस्त्रांचा धाक दाखवून चौघा जणांच्या टोळक्यांनी एका डिलिव्हरी बॉयला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. ९) रात्री सव्वाआठच्या सुमारास वाकड येथील सयाजी हॉटेल समोर घडली.

याप्रकरणी प्रदीप तुकाराम कांबळे (वय २७, रा. पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप बिग बास्केट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. रविवारी रात्री बिग बास्केट कंपनीची डिलिव्हरी देण्यासाठी ते त्यांच्या दुचाकी (क्र.एमएच/१४/ईए/६६३५) वरुन जात होते. वाकडमधील सयाजी हॉटेलसमोरून जात असताना दोन मोपेड दुचाकीवरून चार अनोळखी चोरटे त्यांच्याजवळ आले. त्यांनी प्रदीपला धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याजवळील १८ हजार ५०० रुपयांची  रोख आणि मोबाईल असा एकूण ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. वाकड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.