लष्करातील ४३६ जवानांनी देशनिष्ठेची घेतली शपथ

0
372

अहमदनगर, दि. २० (पीसीबी) – भारतीय लष्करातील महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या येथील मेकॅनाइज्ड रेजिमेंटल सेंटरमधील (एमआयआरसी) ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शनिवारी ४३६ जवानांनी देशनिष्ठेची शपथ घेतली.

प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणारा सचिन नेगी बेस्ट रिक्रुट ठरला असून त्याचा ‘जनरल सुंदर जी गोल्ड मेडल’ देऊन गौरव करण्यात आला. तर, रिक्रुट बी आकाश बालासाहेब आणि रिक्रुट कार्तिक डडवाल यांना अनुक्रमे ‘जनरल के. एल. डिसूजा सिल्वर मेडल’ व ‘जनरल पंकज जोशी कांस्यपदक’ देऊन सन्मानित करण्यात आले. शनिवारी सकाळी शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी शानदार संचलन करीत जवानांनी उपस्थितांची मने जिंकली. लष्कराच्या बँडपथकाने सादर केलेल्या धूनवर जवानांचे आगमन झाले. यासर्वांनी पहिली सलामी कर्नल विनायक शर्मा यांना, दुसरी सलामी कर्नल रसेल डिसुजा यांना तर तिसरी सलामी ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रमण्यम यांना दिली. लेप्टनंट जनरल एस. के.प्राशर यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारली व संचलनाची पाहणी केली. त्यानंतर एमआयआरसी संस्थेने लष्करासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आलेले निशाण (ध्वज) आणण्यात आले. धर्मगुरुंनी जवानांना कर्तव्यासाठी निष्ठा व समर्पणाची शपथ दिली.