रेड झोन मधील जमीन विक्रीच्या बहाण्याने माजी सैनिकाची फसवणूक

0
286

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – रेड झोन मध्ये असलेली जमीन दोघांनी मिळून एका माजी सैनिकाला विकली. यामध्ये माजी सैनिकाची तब्बल 35 लाख रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार दहा मार्च 2021 ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत दिघी आणि भोसरी परिसरात घडला. राजाराम लक्ष्मण ढमाले, शब्बीर इब्राहिम पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अंबाजी विठोबा चव्हाण (वय 52, रा . दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे आर्मी मधून सन 2020 मध्ये सेवानिवृत्त झाले. सध्या ते घरीच असतात. त्यांचा मुलगा देखील आर्मीमध्ये मध्य प्रदेश येथे कार्यरत आहे. चव्हाण दिघी येथे राहत असून त्यांच्या घराशेजारी असलेली मोकळी जागा त्यांना खरेदी करायची होती. ती जागा राजाराम ढमाले यांची असल्याचे समजल्याने चव्हाण यांनी ढमाले यांच्या घरी जाऊन जागेबाबत बोलणे केली. सुरुवातीलाच साडेतीन गुंठे जागेचा 52 लाख 50 हजार रुपयांना व्यवहार ठरला. त्याप्रमाणे भोसरी येथे चव्हाण आणि ढमले यांनी नोटरी केली. सुरुवातीला संपूर्ण व्यवहार तीन महिन्यात करण्याचे ठरले. त्यानुसार ढमाले यांना चव्हाण यांनी 14 लाख रुपये चेक द्वारे दिले.

मात्र त्या जागेची मोजणी होणे बाकी असल्याने त्यांनी 30 ऑगस्ट 2021 रोजी चव्हाण यांच्याशी पुरवणी करारनामा करून जागेचा व्यवहार 50 लाख एक हजार रुपयांना ठरवला. त्यावेळी संपूर्ण व्यवहार दोन महिन्यात पूर्ण करण्याचे ठरले होते. परंतु दोन महिन्यानंतर देखील मोजणीचे कारण सांगून पुन्हा ढमाले यांनी 17 डिसेंबर 2021 रोजी पुन्हा चव्हाण यांच्याशी करारनामा करून विसर पावती नोटरी केली. या जागेच्या व्यवहाराला उशीर होत असल्याने 47 लाख रुपयांना जागा विकण्याचे ठरविले. हा व्यवहार सहा महिन्यात पूर्ण करण्याबाबत ठरले. दरम्यान चव्हाण यांनी ढमाले यांना चेक आणि रोख स्वरूपात 35 लाख रुपये दिले होते.

या संपूर्ण व्यवहारांमध्ये शब्बीर पटेल, त्यांचा मुलगा समीर शब्बीर पटेल व राजाराम ढमाले यांचा मुलगा दिग्विजय राजाराम ढमाले हे साक्षीदार म्हणून हजर होते. शब्बीर पटेल यांनी चव्हाण यांना सांगितले की, पटेल आणि ढमाले हे दोघे मिळून चव्हाण यांच्याशी व्यवहार करणार आहेत. त्यामुळे पटेल यांनी दिलेल्या विश्वासावर चव्हाण यांनी ढमाले यांच्याशी व्यवहार केला. चव्हाण यांनी दिलेल्या रकमेपैकी सहा लाख रुपयांचे चेक शब्बीर पटेल यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. चार लाख रुपयांचे चेक राजाराम ढमाले यांची वहिणी राजश्री ढमाले यांच्या नावावर जमा झाले आहेत. उर्वरित चार लाख रुपयांचे चेक राजाराम ढमाले यांच्या नावावर जमा झाले आहेत. इतर 21 लाख रुपये चव्हाण यांनी ढमाले आणि पटेल यांना रोख स्वरूपात दिले आहेत.

सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर ढमाले आणि पटेल यांना वेळोवेळी भेटून व्यवहार पूर्ण करण्याबाबत चव्हाण यांनी विचारणा केली. मात्र ढमाले आणि पटेल यांनी व्यवहार करण्यास टाळाटाळ करून त्या जागेचा वाद कोर्टात सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर ढमाले यांनी संबंधित जागा पटेल यांना विकसित करण्यासाठी दिली असून तुम्हाला ती जागा विक्री करता येणार नसल्याचे सांगितले. दरम्यान चव्हाण यांनी या व्यवहारासाठी 35 लाख रुपये दिले होते. ते पैसे त्यांना परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.