राष्ट्रवादीने पाडले ‘एमआयएम’च्या गढीला खिंडार?

0
210

सोलापूर, दि. ६ (पीसीबी) : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला सुगीचे दिवस आले आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गळती लागलेल्या राष्ट्रवादीत आता नित्यनियमाने इनकमिंग सुरु आहेत. यामध्ये आता सोलापूरमधील एमआयएम पक्षाचे नेते तौफिक शेख यांची भार पडली आहे..

गेल्या काही दिवसांपासून तौफिक शेख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. तौफिक शेख यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांची भेट घेतली. आता ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वेळ घेऊन सहा नगरसेवकांसह सोलापुरमध्येच कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील.
सोलापूर महानगरपालिकेतील ‘एमआयएम’चे सर्व नगसेवक गळाला
सोलापूर महानगरपालिकेतील दहापैकी सहा नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तर उर्वरित चार नगरसेवकांनीही पक्षाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयएमचे पालिकेतील संख्याबळ दहावरून थेट शून्य होणार आहे.

राष्ट्रवादीची सोलापूरातील ताकद वाढणार
तौफिक शेख यांनी 2014 मध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक लढवली होती. यात प्रणिती शिंदे आणि तौफीक शेख यांच्यात चुरशीची लढत झाली होती. सोलापूर शहर मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. परिणामी तौफिक शेख यांच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.
‘तौफिक भाई आपको मुंबई आना होगा, या मैं फिर सोलापूर आऊंगा’
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापुरातील हेरिटेज हॉल येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी आवर्जुन तौफिक शेख यांची भेट घेतली होती.
यावेळी जयंत पाटील यांनी म्हटले होते की, कुछ दिनों बाद तौफिक भाई आपको मुंबई आना होगा, या मैं फिर सोलापूर आऊंगा. आप जैसे तय करेंगे वैसे होगा.