घाबरू नका, महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव नाही; वन विभागाचा दिलासा!

0
205

मुंबई, दि.६ (पीसीबी) : देशातील पाच राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा कहर झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र बर्ड फ्ल्यूची एकही केस आढळलेली नाही. राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झालेला नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका, असं आवाहन राज्याच्या वन विभागाने केलं आहे. ‘पीटीआय’ने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. या क्षणापर्यंत राज्यात कोणत्याही भागात बर्ड फ्ल्यूची एकही केस आढळलेली नाही, असं मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी सांगितलं. मध्य प्रदेशात काही कावळ्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची लक्षणे आढळली आहेत. केरळ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही बर्ड फ्ल्यूचा फैलाव झालेला आहे. केरळमध्ये तर बर्ड फ्ल्यूला राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

केरळमध्येही बर्ड फ्ल्यूचा कहर वाढल्याने हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्ट्यम आणि अलाप्पुझा जिल्ह्यात खासकरून बर्ड फ्ल्यूचा कहर वाढला आहे. बर्ड फ्लूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या परिसरापासून एक किलोमीटर क्षेत्रातील बदक, कोंबड्या आणि पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. H5N8 व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागत असल्याची माहित अधिकाऱ्यांनी दिली. कोट्टायम जिल्ह्यातील नीदूर येथे बदक पालन केंद्रातील 1500 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची साथ ही अत्यंत वेगाने पसरते. H5N8 व्हायरसमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होता. माणसांनाही याची लागण होऊ शकते. महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात 2006मध्ये बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाला होता. यावेळी हजारो कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली होती.
तर, पशूसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधा

दरम्यान, मंत्री सुनील केदार यांनीही महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मध्ये प्रदेश आणि राजस्थानमध्ये बर्ड फ्ल्यू साधर्म्य लक्षणं असलेल्या काही कोंबड्या सापडल्याची चर्चा आहे. वास्तविक त्यांना बर्ड फ्ल्यू झालेला नाही, असं सुनील केदार यांनी सांगितलं. राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स पाळल्या जात आहेत, असं सांगतानाच अन्य काही कारणाने जनावरांचा मृत्यू झाल्यास तात्काळ पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.