राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार; अजित पवारांचा विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम

0
644

मुंबई, दि. १० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणत्याही  पक्षात विलिनीकरण होणार नाही. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार, असे स्पष्ट करून  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या काँग्रेसमधील विलीनिकरणाच्या  चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी  कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले की, लोकसभेच्या निकालाच्या चर्चा आता उगाळत बसू नका. पुढे विधानसभा आहे त्याकडे लक्ष द्या.  कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागले पाहिजे.  ईव्हीएम घोटाळ्याच्या नावाखाली कामे करणे सोडू नका, असे  सांगून कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. लोक लोकसभेत वेगळा विचार करतात, विधानसभेत वेगळा विचार करतात. त्यामुळे आता चर्चा नको, कसून प्रयत्न करा. विधानसभेसाठी लोकांपर्यंत पोहोचा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांनी केल्या.

ईव्हीएम मशिनबाबत सर्व प्रयत्न केले. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांच्यापर्यंत पोहोचून झाले. एका पक्षाने सांगितले पुढच्या निवडणूकीत ईव्हिएम असेल, तर आम्ही निवडणूक लढवणार नाही. पण, लोकशाहीत असे चालणार नाही. जेव्हा हरले तेव्हा ईव्हीएम मशिनचा घोटाळा आणि जेव्हा जिंकले तेव्हाही ईव्हीएम होतेच की, असे म्हणत ईव्हीएमवर खापर न फोडता लोकांपर्यंत पोहोचणे सोडू नका, असे  पवार म्हणाले.