युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

0
460

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाला २०११ चा विश्वचषक व पहिला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती पत्करली आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा युवराजने आज मुंबईत केली. हा कटू निर्णय जाहीर करताना त्याचे डोळे पाणावले होते.

बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या युवराजला नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेतही फारशी चमक दाखवता आली नव्हती. त्यामुळे निवृत्तीचा विचार त्याच्या मनात घोळत होता. त्यातच सध्या सुरू असलेल्या विश्वचषकासाठी विचारही झाला नाही. बदलत्या परिस्थितीचा विचार करून त्याने अखेर थांबण्याचा निर्णय घेतला. निवृत्तीची घोषणा करण्यासाठी युवराजने एक पत्रकार परिषद घेतली.

तब्बल १७ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा युवराज निवृत्तीबद्दल बोलताना भावूक झाला होता. ‘खेळाच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्याने आभार मानले. क्रिकेटने मला खूप मित्र दिले. क्रिकेटने मला खूप मित्र दिले. या सर्वांचा मी ऋणी आहे,’ असे तो म्हणाला. देशासाठी खेळण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सतत प्रयत्न केला. एकंदर २५ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत मी अनेक चढउतार पाहिले आहेत. ते सर्व मागे सोडून पुढे जाण्याचा निर्णय मी घेतलाय. या खेळाने मला लढायला शिकवले. पडल्यानंतर पुन्हा उठायचे आणि चालायला लागायचे हे मला क्रिकेटने शिकवले,’ असे तो म्हणाला.