राष्ट्रपुरूषांच्या यादीत धर्मवीर संभाजी महाराज यांचा समावेश करा : आमदार महेश लांडगे

0
489

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम महाराष्ट्रासह अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी हौताम्य पत्करले आहे. त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज यांचा समावेश राष्ट्रपुरूषांच्या यादीत करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

मुंबई हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित नाहीत. त्यामुळे मागणीचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालय आणि प्रधान सचिव कार्यालयाकडे देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शिवरायांच्या विचारांवर आम्हा महाराष्ट्रवासीयांची अपार श्रद्धा आहे. संपूर्ण जगभरात कीर्ती असलेल्या आपल्या राजाचा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या दिनदर्शिकेत ‘राष्ट्र प्रतिक’ म्हणून करावा. तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, असा इतिहास आहे.
हिंदू धर्म आणि हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी प्राण वेचणाऱ्या आपल्या शंभूराजाप्रति आदर व्यक्त करीत छत्रपती संभाजी महाराजांचा शासकीय दिनदर्शिकेत ‘धर्म प्रतिक’ म्हणून उल्लेख व्हावा, अशी माझ्यासह तमाम शिव-शंभू प्रेमींची अपेक्षा आहे. त्यामुळे अधिवेशन ५ दिवसांचे असले तरी लक्षवेधी किंवा पंचतारांकित प्रश्न न मांडता याबाबत चर्चा व्हावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
शासकीय अस्थापनांमध्ये संभाजी महाराज जयंती साजरी करावी…
विशेष म्हणजे, राज्य सरकारच्या दिनदर्शिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा उल्लेख नाही. त्यामुळे शासनाने ती चूक तात्कळ दुरूस्त करावी. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आणि पुण्यतिथी सर्व शासकीय कार्यालये आणि आस्थापनांमध्ये साजरी करण्यात यावी. तसे आदेश सर्व विभागाच्या कार्यालयांना द्यावेत, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.