रामदेव बाबांनी माफी न मागितल्यास त्यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही – जितेंद्र आव्हाड

0
774

मुंबई,दि.२१(पीसीबी) – योगगुरु रामदेव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या वादावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही भाष्य केलं असून त्यांनी रामदेव बाबांना इशाराच दिला आहे.

आव्हाडांनी एक व्हिडिओ पोस्ट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. “रामदेव बाबांनी माफी न मागितल्यास त्यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही,” असा इशारा आव्हाडांनी ट्विटवरुन दिला आहे.

बुधवारी आव्हाडांनी सानापाडा येथील पतंजलीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाला भेट दिली. येथे त्यांनी पतंजलीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपला संताप व्यक्त केला. “रामदेव बाबांनी पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना वैचारिक दहशतवादी म्हणणे अत्यंत चुकीचं आहे,” असं मत आव्हाड यांनी या अधिकाऱ्यांशी बोलताना नोंदवले. ट्विटवरुन यासंदर्भात आक्षेप व्यक्त करत एक व्हिडिओ पोस्ट केला. या ट्विटमध्ये त्यांनी “जातीनिर्मूलनाचे काम करणारे डॉ. आंबेडकर आणि पेरियार ई.व्ही. रामास्वामी यांना रामदेवबाबा वैचारिक दहशदवादी म्हणतो हे महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही, रामदेव बाबाने लवकरात लवकर माफी मागितली नाही तर त्याला महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार,” असं म्हटलं आहे.

“त्याला बाबा कोण म्हणतं मला माहित नाही. त्याची अक्कल गुडघ्यामध्ये आहे. रामदेव कुठल्या विचारांनी घडलाय याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मात्र या देशातील मागासलेल्या समजाला न्याय मिळाला आणि त्यांची धोरणं ज्यांच्यामुळे अधोरेखित झाली त्या व्यक्तीचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे. ते एका जातीचे नव्हते ते संपूर्ण भारतीय समाजाचे आहेत. तुम्हा आम्हाला सुरक्षित ठेवणारे संविधान आंबेडकरांनीच आणले. पेरियार आणि आंबेडकर जातीव्यवस्थेविरोधात लढले. त्यामुळे रामदेव बाबाने शहाणपणा दाखवून माफी मागितलेली बरी,” असं आव्हाड या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.