राफेलप्रकरणी मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी – पूनम महाजन

0
824

पुणे, दि. १७ (पीसीबी) – बोफोर्स घोटाळ्याचा डाग पुसून काढण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी राफेल करारावरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करत आहेत.  ते खोट्या माहितीच्या आधारे आरोप करत असून त्यांनी आधी यासाठी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष आणि खासदार पूनम महाजन यांनी केली आहे. तसेच त्यांनी माफी न मागितल्यास देशभरातील भाजप कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयांबाहेर आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आज (सोमवारी) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूनम महाजन बोलत होत्या. राफेल प्रकरणाची माहिती देणारे खबरी कोण आहेत ? हे राहुल गांधींनी सांगावे अशी मागणी देखील महाजन यांनी केली. तसेच भाजपवर सध्या जे विमान खरेदीवरुन आरोप करत आहे. त्यांनी देशाच्या रक्षणासाठी २००७ ते २०१४ दरम्यान विमान खरेदी का केली नाही ?, असा सवालही  महाजन यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणावर माफी मागावी, अन्यथा  देशभरातील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते आंदोलन करतील, असा इशारा महाजन यांनी दिला.

काँग्रेसने  राफेलबाबतच्या  तक्रारीवर संसदेत चर्चा करावी. मात्र,  संसदेचे कामकाज विरोधक घोषणाबाजी करुन चालू देत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. संसदेच्या बाहेर आरोप करत राहुल गांधी देशाची प्रतिमा मलिन करत आहेत. काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयाचा वापर आपल्या स्वार्थासाठी केला जात आहे, असा आरोपही  त्यांनी यावेळी केला.