राज्यात नवी राजकीय समीकरणे तयार होतील – प्रकाश आंबेडकर

0
214

नागपूर, दि. २० (पीसीबी) – राष्ट्रवादीत पुन्हा दोन स्फोट होणार, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच केले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे भाजपला डोईजड ठरू शकतात, असे स्फोटक वक्तव्य त्यांनी केले आहे. आता राज्यात नवी राजकीय समीकरणे तयार होतील, असेही ते म्हणाले.

काल (ता. १९) नागपुरात आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने बरीचशी स्पष्टता झाली आहे. तरीही राज्यात ऑगस्टपर्यंत अस्थिरता राहील. शिवाय कर्नाटकच्या निकालानंतर अनेकजण मोकळेपणाने बोलत आहेत. परंतु, जेडीएसमुळे काँग्रेसला तेथे फायदा झाल्याचाही दावा आंबेडकरांनी केला.

शालीनीताई पाटील यांचे मनी लॉन्ड्रींगबद्दलचे वक्तव्य अत्यंत महत्वाचे आहे. त्यातच अमित शाह यांच्या ४८ जागा जिंकण्याचा दावा बरेचसे सांगून जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे नोंदणीकृत शिवसेना गेल्याने ठाकरे अडचणीत आले आहेत. ते आता अपात्रतेबाबतच्या निर्णयापर्यंत नवा पक्षही नोंदणीकृत करू शकत नाही. तर, शिंदे हे भाजपला डोईजड ठरू शकतात, असाही प्रवाह आहे.

सरकार तूर्तास स्थिर असले तरीही राज्यात ऑगस्टपर्यंत अस्थिरता असेल. महाविकास आघाडी सध्या सन्मानपूर्वक सेवानिवृत्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. काँग्रेस आपला पहिला क्रमांक सोडायला तयार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेकजण अडचणीत आहेत. तुरुंग की स्वतंत्रता? यांपैकी एकाचा निर्णय त्यांना करायचा आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत याबाबतची कारवाई सुरू होऊ शकते, असे संकेत देत त्यांनी महाविकास आघाडी परिस्थिती सांगितले.

जगात आम्ही महाशक्ती, आम्हीच श्रेष्ठ, जगाचे आम्हीच नेते, असा दावा करणारे मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल. रशियाच्या पुतीनला सल्ले दिले, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मोदींना जुलैमध्ये अमेरिका दौऱ्यात जायचे आहे. संयुक्त राष्ट्राला ते भेट देणार आहेत. परंतु, काही खुलासे त्यांच्याकडून होणे अपेक्षीत आहेत. डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात ४९ टक्के अमेरिकन सिटीझन्सची असलेली ‘वेनेंबल फंडीग’ ही गुंतवणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे.

या गुंतवणुकीतील पैसा ‘कॉल बॅक’ करण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे देशात जुलैमध्ये प्रचंड महागाई वाढेल. या पैशाबद्दल मोदी सरकारने खुलासा करणे अपेक्षीत आहे. नव्हे तर राष्ट्रीय पक्षांनी हा मुद्दा गंभीरतेने घेत तसा जाब विचारायला हवा, असे आंबेडकर म्हणाले. जगात भाजप-आरएसएसने मांडलेली भूमिका ही भारतीयांची नाही, हे समजून घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

ठाकरे गटासोबत वंचितची आघाडी आहे. परंतु, इतर पक्षांकडून प्रतिसाद नाही. ठाकरेंनी वंचितला आघाडीत सहभागी करून घ्यायची त्यांची जबाबदारी आहे. वंचित कायम स्पष्ट भूमिका घेत आली आहे. जायचे तर हो, नाही तर नकार दर्शविते. त्यामुळे काय होईल, हे आताच सांगता येत नाही. परंतु, राज्यात नवे राजकीय समीकरणही तयार होऊ शकते, असे आंबेडकर म्हणाले.

केसीआर राव यांची बीआरएस सीमेवरील जिल्ह्यात चांगली कामगिरी करेल. तर, संभाजीराजे शाहू यांचा स्वराज्य पक्ष २७ मे रोजी अस्तित्वात येत आहे. या दोघांनाही राज्यात चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे भविष्यात हे दोघेही मित्र होऊ शकतात, असे संकेत आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) दिले.