रहाटणीत जमिनीच्या वादातून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला बघून घेण्याची धमकी

0
768

रहाटणी, दि. २८ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून सख्खा भाऊ आणि त्याचा साथीदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. २६) दुपारी पावणेदोनच्या सुमारास रहाटणी येथे घडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास गबाजी थोपटे (वय ५५, रा. गोडांबे कॉर्नर जवळ, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मारूती गबाजी थोपटे (वय ४५), सोनाली मारूती थोपटे (वय ४०, दोघे रा. रामनगर, रहाटणी) यांच्यासह त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास आणि आरोपी मारूती थोपटे हे सख्ये भाऊ आहेत. त्यांची रहाटणी येथे १९४ गुंठे जागा आहे. यापैकी कैलास यांच्या नावावर ३२ गुंठे, विलास थोपटे यांच्या नावावर ३३ गुंठे, आरोपी मारूती थोपटे यांच्या नावावर ३३ गुंठे, विकास थोपटे यांच्या नावावर ३२ गुंठे जागा आहे. या जागेला फिर्यादी व आरोपी वारसदार आहेत. आरोपी यांनी रविवारी चार जेसीबी घेऊन विकास थोपटे यांच्या नावावरील जागेत विना परवाना खोदकाम सुरू केले. याला कैलास यांनी विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.