यंदा दुष्काळी भागातील धरण परिसरात कृत्रिम पाऊस पडणार; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

0
509

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – दुष्काळी भागातील धरण परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या निर्णयाला  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  आज (मंगळवारी)  मंजुरी देण्यात आली आहे.  या निर्णयामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळू शकतो. 

राज्यात यंदा भीषण दुष्काळ असून  यंदाही विदर्भ, मराठवाड्यात कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  महाराष्ट्रातील पश्चिम किनारा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता साऊथ एशियन क्लायमेट आऊटलूक फोरम (सॅसकॉफ) या संघटनेने वर्तवला आहे.  या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसाळ्यात पर्जन्यवाढीसाठी राज्यात उपाययोजना  करण्यास मान्यता देण्यात आली.  दुष्काळग्रस्त भागातील धरण परिसरात हा प्रयोग केला जाणार आहे. पावसाळ्यात काही दिवस पावसाचा खंड पडतो त्याला ‘मान्सून ब्रेक’ असे  म्हटले  जाते. या काळात आकाशात ढग असतात, परंतु त्यांच्यातील पाऊस निर्माण होण्याची प्रक्रिया संथ झालेली असते.  कृत्रिम पावसाच्या तंत्रज्ञानाने ही प्रक्रिया विकसित करता येते.  राज्यात यापूर्वी २००३ आणि २०१५ मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग  करण्यात आला होता.