यापुढेही पक्षाचे काम करत राहणार – खासदार अनिल शिरोळे

0
695

पुणे, दि. २३ (पीसीबी) – माझ्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्यांसाठी मी भाजपचा ऋणी आहे.  यानंतरही मी पक्षाचे काम करत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे भाजप खासदार अनिल शिरोळे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने  खासदार शिरोळे यांचे तिकीट कापून गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. यावर शिरोळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल शिरोळे म्हणाले की, भाजपने आतापर्यंत माझ्यावर टाकलेली जबाबदारी  प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे.  भाजपने वेळोवेळी माझ्यावर टाकलेल्या या जबाबदाऱ्यांसाठी मी त्यांचा ऋणी आहे.  यानंतरही  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षाचे काम करत राहणार आहे.

पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने जास्तीत जास्त मतांनी पुण्याची जागा निवडून आणण्यासाठी मी कार्यरत असणार आहे, असे शिरोळे यांनी म्हटले आहे.  दरम्यान, भाजपने शिरोळे यांचे तिकीट कापल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर स्वत: शिरोळे यांनी खुलासा केल्याने पडदा पडला आहे.