‘यही है अच्छे दिन?’ युवा सेनेचा सवाल; पेट्रोल पंपावरच केली मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी

0
348

मुंबई, दि.२२ (पीसीबी) : पेट्रोल-डिझेलच नाही तर गॅसच्या किंमतीदेखी वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या डोक्याचा ताप आणखीन वाढत आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली. आता त्यातच भर म्हणून पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे त्यांच्या खिशावर आणखीन ताण पडला आहे. त्यामुळे मोदी सरकारवर चारी बाजूंनी सडकून टीका होत आहे. यामध्ये आता पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून “यही है अच्छे दिन?” असा सवाल करत मोदी सरकारला युवा सेनेने घेरलं आहे.

शिवसेनेची युथ विंग असलेल्या युवा सेनेने पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरांवरून मुंबईतील वांद्रे परिसरात ठिकठिकाणी पोस्टर लावत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान वांद्रे परिसरातील रस्त्यांच्या बाजूला आणि पेट्रोल पंपावर युवा सेनेनं छोट्या होर्डिंग्ज लावल्या आहेत. यात होर्डिंग्जवर २०१५ आणि २०२१ मधील पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरातील तफावत दाखवून देत युवा सेनेनं हेच आहेत अच्छे दिन? असा उपरोधिक सवाल केला आहे. २०१५ मध्ये स्वयंपाकाच्या गॅसचा सिलेंडर ५७२ रुपयांना मिळत होता. त्याची किंमत वाढून हा सिलेंडर आता ७१९ रुपयांपर्यंत वाढल्याचं पोस्टरवर म्हटलं आहे. त्याबरोबरच २०१५मध्ये प्रती लिटर ५२ रुपयांना मिळणाऱ्या डिझलचे दर २०२१मध्ये ८८.०६ रुपयांवर पोहोचले आहेत. तर ६४.६० रुपये प्रती लिटर मिळणाऱ्या पेट्रोलचे दरही आता ९६.६२ रुपयांवर गेल्याचं युवा सेनेनं पोस्टरमधून म्हटलं आहे. आणि यही है अच्छे दिन?” असा सवाल मोदी सरकारला केला आहे.