म्हाळुंगेत तरूणाचा खून, हिंजवडी ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

0
561

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – म्हाळुंगे-शितळादेवीनगर येथील स्कायबे सोसायटीसमोर एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. २२) घडली.  

कुमार तानाजी कसबे (वय २८, रा. कोळेकर निवास, म्हाळुंगे, मुळ रा. काठी, ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद) असे मृत तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार हे शनिवारी दुचाकीवरून कोठे तरी गेले होते. ते दुसऱ्या दिवशी घरी आले, तेव्हा त्यांचे बाणेर येथे राकेश याच्याशी भांडण झाले. त्याठिकाणी राकेश व त्याच्या साथीदारांनी मारहाण करून कुमार यांना रात्रभर डांबून ठेवले. त्यांच्या डोक्यात खुप वेदना होत असून ते राकेशच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यासाठी जाणार होते. असे कुमार यांनी त्यांच्या पत्नीला सांगून ते घराबाहेर पडले. मात्र, दुसऱ्या दिवशी शितळादेवी नगरमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत मोहिते करत आहेत.