मंगलनगर परिसरात रात्रीची गस्त घालण्याची मानवाधिकार संघटनेची मागणी

0
482

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – थेरगावातील मंगलनगर, वाकड रोड परिसरात अज्ञात व्यक्ती संशयितरित्या रात्रीच्या वेळी फिरत आहेत. तसेच एक व्यक्ती एका घरात घुसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे महिला, लहान मुले, वृध्द यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी या परिसरात रात्रीचे पोलिस पेट्रोलिंग (गस्त) सुरू करण्यात यावी, अशी मागणी मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी (दि. २२ ) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मंगलनगर कॉलनी नंबर १ मध्ये घरात कोणी नसल्याचे पाहून एक अज्ञात व्यक्ती घरात शिरली. त्यानंतर घरात असणाऱ्या दोन महिलांनी आरडाओरडा केला असता ती व्यक्ती पळून गेली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी परिसरात रात्रीची गस्त घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी मानवाधिकार संघटनेचे रामराव नवघन, सुभाष कोठारी, नितीन चौधरी, लक्ष्मण दवणे, दिलीप टेकाळे, मुनीर शेख, अविनाश रानवडे, विजय मैड, सतिश नगरकर आदी उपस्थितीत होते.