मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार सुनैत्रा अजित पवार यांना

0
440

पुणे, दि. २२ (पीसीबी) : श्रीमन् महासाधू मोरया गोसावी संजीवनी समाधी सोहळा मंगळवार दि २१ ते शनिवार दि २५ या दरम्यान चिंचवड येथे संपन्न होणार आहे. सोहळ्याचे हे ४६० वे वर्ष आहे . यानिमित्ताने महापुजा , होम हवन , शिबीर , मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित केला जाणार असून यावर्षीचा दिला जाणारा श्रीमन् महासाधू मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनैत्रा अजित पवार यांना दिला जाणार आहे .

चिंचवड देवस्थान ट्रस्ट , पिंपरी चिंचवड महानगर पालीका व ग्रामस्थांच्या वतीने संजीवनी समाधी सोहळा चिंचवड येथे साजरा केला जातो . या महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी समाजातील असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला देवस्थानच्यावतीने जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. याबाबत चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देव , विनोद पोपटराव पवार , विश्राम भालचंद्र देव , आनंद विश्वनाथ तांबे , राजेंद्र बाबुराव उमाप यांची बैठक नुकतीच संपन्न झाली . यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

सुन्नेत्रा पवार यांनी बारामती टेक्सटाइल पार्क मार्फत हजारो महीलांना रोजगार उपलब्ध करुन देऊन महीला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत . ईव्हायरमेंट ऑफ फोरमच्या माध्यमातून आज अखेर पाच लाखपेक्षा अधीक वृक्षलागवड व संवर्धनाचे कार्य केले आहे . उन्हाळ्याच्या दिवसात वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यासाठी बारामती , दौंड , ईंदापुर आदी तालुक्यातील राखीव वनक्षेत्र , अभयारण्यात पाणवठे तयार केले , टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्याचे विशेष कार्य केले आहे. तर समाजातील बारा हजार पेक्षा अधीक गोरगरीब रुग्णांवर काचबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यासह शैक्षणिक , सामाजिक अशी असंख्य समाजाभिमुख कामे त्यांनी केली आहेत.

यामुळे विश्वस्त मंडळाने समाधी दिनाच्या पुर्व संधेस शुक्रवार दि . २४ रोजी यावर्षीचा श्रीमन् महासाधू मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार सुन्नेत्रा पवार यांना देण्याचे ठरविले आहे . हा कार्यक्रम सायंकाळी ६ ते ८ वेळेत संपन्न होणार आहे .या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.